नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

भगवान खैरनार
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मोखाडा : आदिवासी विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यामुळे त्याला इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळेत इंग्रजी शिक्षण ही योजना सुरू केली आहे. मात्र, याच नामांकित पाचगणी येथील शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ जुन्नर येथील येनेरे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जव्हार मधील चार मुलींशी अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. तर पालकांना कोणत्याही सूचना न देता सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे धाडस पाचगणीच्या शालोम इंटरनॅशनल स्कूलने केले आहे.

मोखाडा : आदिवासी विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यामुळे त्याला इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळेत इंग्रजी शिक्षण ही योजना सुरू केली आहे. मात्र, याच नामांकित पाचगणी येथील शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ जुन्नर येथील येनेरे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जव्हार मधील चार मुलींशी अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. तर पालकांना कोणत्याही सूचना न देता सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे धाडस पाचगणीच्या शालोम इंटरनॅशनल स्कूलने केले आहे. त्यामुळे घडलेल्या या घटनांमुळे नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्याची सुरक्षा धोक्यात आली आहे.  

आदिवासी विद्यार्थ्याना ही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, आणि आताच्या स्पर्धेच्या युगात तो टिकावा ही प्रामाणिक इच्छा ठेवून, आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळेत इंग्रजी शिक्षण ही योजना गेली चार वर्षापासून सुरू केली आहे. पालघर जिल्हयातील जव्हार आणि डहाणू या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे सुमारे दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थी पाचगणी, महाबळेश्वर, जुन्नर, शहापूर या तालुक्यातील नामांकित इंग्रजी शाळेत दाखल केली आहेत. मात्र, या ठिकाणी यापूर्वी सोयीसुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तशाही अवस्थेत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे सुरूच ठेवले होते.

मात्र, मागील महिन्यात डहाणू प्रकल्प कार्यालयाद्वारे पाचगणीतील शालोम इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेपाठोपाठ जुन्नर तालुक्यातील येनेरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जव्हार तालुक्यातील सहावीत शिकणार्‍या चार विद्यार्थीनींशी बाथरूममध्ये बोलावून दोन शिक्षकांनी अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संतापलेल्या आदिवासी पालक व संघटनांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

पालक आणि आदिवासी संघटनांच्या रुद्रावतारामुळे जुन्नर पोलीसांनी येनेरे शाळेचे संस्थाचालक सचिन घोगरे याला अटक केली आहे. तर दुसरा शिक्षक फरार झाल्याची माहिती पालकांनी दिली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा लावणार्‍या, आणि आदिवासीं विद्यार्थीनींच्या गरिबीचा फायदा घेणार्‍या या घटनेमुळे जव्हार आणि डहाणू तालुक्यात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, पाचगणीतील शालोम इंटरनॅशनल स्कूल मध्ये मागील महिन्यात घडलेल्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर 28 जानेवारीला येथे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने पालकांना कुठलीही सूचना अथवा न कळविता घरी सोडून देण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. 

जव्हार पासून सुमारे 450 किलोमीटर अंतरावरून ही सर्व आदिवासी मुलं जिव मुठीत धरून आपल्या गावी रात्री ऊशिरा पोहोचली आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची कसलीच माहीती जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला नाही. त्यामुळे ते देखील हैराण झाले आहेत. प्रवासादरम्यान काही अघटित घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असा संतप्त सवाल आदिवासी पालकांनी उपस्थित केला आहे. या सर्व घटना बघता इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सजा बनली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

 

Web Title: Marathi news palghar news tribal students insecure in schools