आदिवासी युवक-युवती देशसेवेसाठी तयार होणार

भगवान खैरनार
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मोखाडा : आदिवासी युवक आणि युवतींकडे काटक आणि कणखरपणा आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि रोजगार निर्मितीसाठी मोखाड्यात आदिवासी युवक, युवतींसाठी सैन्य वा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतींचे ऊद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रशिक्षण केंद्रातून आदिवासी युवक आणि युवती देश सेवेसाठी तयार होणार आहेत. 

मोखाडा : आदिवासी युवक आणि युवतींकडे काटक आणि कणखरपणा आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि रोजगार निर्मितीसाठी मोखाड्यात आदिवासी युवक, युवतींसाठी सैन्य वा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतींचे ऊद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रशिक्षण केंद्रातून आदिवासी युवक आणि युवती देश सेवेसाठी तयार होणार आहेत. 

आदिवासी विकास विभागाने सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी सुमारे एक कोटी 38 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या ऊद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी आदिवासी मुलामुलींना याच सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर पालघर मध्ये एसटीतील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे सांगितले आहे. या प्रशिक्षण केंद्रांचा आदिवासी मुला मुलींना मोठा फायदा होणार आहे. तसेच यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सवरा यांनी सांगीतले आहे. तसेच जिल्हयातील शिक्षित बेरोजगार तरूणांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तारापूर, बोईसर येथील औद्योगिक वसाहतींमधील कारखाण्यांमध्ये प्रशिक्षित तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपण उद्योजकांशी करार करणार असल्याचे सवरा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले आहे. 

दरम्यान, या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊन अभ्यासात कठोर मेहनत घेण्याचे आवाहन विष्णु सवरा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. प्रमुख अतिथी म्हणून असलेल्या मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी आपल्या भाषणातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा लोकप्रतिनिधींशी समन्वय नसल्याचे सांगत वाघ यांनी कार्यक्रम पत्रिकेतील चुकांचा पाढाच वाचला. तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी बाबत विष्णु सवरा यांचे आभार मानले. तसेच तालुक्यातील सुर्यमाळ येथील आश्रमशाळा संकुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केला आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी काही अघटित घटना होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्य़ात क्रिडा संकुल बांधण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्याकडे केली. 

जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी ही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देत मुला मुलींनी योग्य वयातच लग्न करण्याचे सांगत कुपोषण निर्मुलनाचा सल्ला दिला आहे. तसेच सदरचे प्रशिक्षण केंद्र बांधण्यास बांधकाम विभागाने दहा वर्षाचा कालावधी लावल्याने प्रकाश निकम यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांचे अध्यक्षीय भाषण संपताच येथे सैन्य व पोलीस दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विध्यार्थ्यांनी येथे पाण्याची व्यवस्थाच नसल्याची व्यथा मंत्र्यांसमोर मांडली. त्यावेळी आदिवासी विकास विभागाच्या जव्हार प्रकल्प अधिकारी पवणीत कौर यांनी येथे पाण्याची व्यवस्था होईपर्यंत जव्हार येथे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येईल असे प्रशिक्षणार्थींना आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध नसताना ऊद्घाटनाचा अट्टाहास कशासाठी केला ? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, जव्हारच्या माजी सभापती ज्योती भोये, जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी पवणीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पवार यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

Web Title: Marathi news palghar news youth from tribal areas come for country