पोलिसांनी दिली प्रामाणिक रिक्षाचालकाला शाबासकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

उल्हासनगर : कल्याणच्या महिलेची अनावधानाने रिक्षाच्या मागच्या डिक्कीत विसरलेली बॅग या महिलेला परत मिळवून देण्यात उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सक्रिय यंत्रणा राबवली. त्यामुळे या महिलेला तिची बॅग परत मिळाली असून त्यातील एक लाख रुपयांचा ऐवज सुरक्षित मिळाला आहे. रिक्षात बॅग विसरल्याची माहिती मिळताच, रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत बॅग वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर पोलिसांनी या रिक्षा चालकाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्याचा सत्कार केला आहे.
 
रिंकू निलेश मेश्राम ही महिला कल्याण मधील पिसवली गाव, पांडेचाळ येथे राहते. काल मेश्राम ह्या उल्हासनगरात आल्या असता, त्यांनी नेहरू चौकातून शेअरिंग रिक्षातून कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनीपर्यंत प्रवास केला. इतर प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून त्यांनी मागे बॅग ठेवली. अनावधानाने ती बॅग रिक्षातच राहिली. खाली उतरल्यावर मेश्राम यांच्या बॅग विसरल्याचे लक्षात आले. पण तोपर्यंत रिक्षाचालक दुसऱ्या ग्राहकांना बसवून पुन्हा नेहरू चौकाकडे मार्गस्थ झाला. मेश्राम यांनी नेहरू चौक गाठले. त्यांनी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण यांना रिक्षात बॅग विसरल्याचे सांगून त्यात दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे वाळे आणि 15 हजार रुपये रोख असल्याचे सांगितले.

पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण यांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप गोसावी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा हलवली. सर्व रिक्षा युनियनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी नेहरू चौक ते कैलास कॉलनी असा शेअरिंगने सीट भरणाऱ्या अनेक रिक्षा चालकांशी फोन करून विचारणा केली. तेव्हा रिक्षाचालक आप्पाराव कराळे यांनी रिक्षा थांबहुन डिक्कीवर बघितले असता त्यांना तिथे काळी बॅग दिसली. कराळे यांनी तात्काळ नेहरू चौक गाठले आणि पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण यांच्या समक्ष रिंकू मेश्राम यांची बॅग त्यांच्या सुपूर्द केली. मेश्राम यांनी बॅग तपासून बघितली असता बॅग मधील सोन्या चांदीचे दागिने, रोख रुपये सुरक्षित होते. जितेंद्र चव्हाण यांनी आप्पाराव कराळे यांना शाबासकी देऊन त्यांचा सत्कार केला.

Web Title: Marathi news police appreciate auto rikshaw driver