पडद्यामागच्या गाण्यांची पुस्तकरूपी कहाणी उलगडणार

Padadyamagch gana
Padadyamagch gana

उल्हासनगर : आपण चित्रपट पाहताना जी लोकप्रिय गाणी बघतो आणि बाहेर पडतो तेव्हा आपल्या लक्षात राहतात ते हिरो-हिरोइनचेच चेहरे. पण या गाण्यांसाठी जे कधी आनंदी तर कधी भावनिक करून सोडणारे लोकेशनरुपी वलय, गाणे, गीतकार, संगीतकार, कल्पना, नेपथ्य, फोटोग्राफी, टेक्निकल त्याकडे आपले लक्षच नसते. पडद्यामागील या गाण्यांच्या कहाणीचा पुस्तकरूपी उलगडा उल्हासनगरमधील साहित्यिकेने केला आहे. रविवारी 4 वाजता ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात ख्यातनाम लेखिका मल्लिका अमरशेख यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक दर्दी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

पडद्यामागील गाणं पुस्तकरूपात साकारणाऱ्या या साहित्यिकेचे नाव अजिता साने-सोनाले असून त्यांनी 31 जुलै 2017 रोजी शिक्षकी पेशातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. अजिता यांनी राजकपूर, गुरुदत्त, देवानंद, मनोजकुमार, संजीवकुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, मेहमूद आदी अभिनेत्यांवर चित्रित झालेल्या 40 आणि 10 मराठी अशा 50 जुन्या गाण्यांच्या पडद्यामागील गाण्यांची कहाणी लिहली आहे. त्यात नटरंग या मराठी चित्रपटातील "खेळ मांडला" या गाण्याचा देखील समावेश आहे. 

एक गाणं तीन ते चार दिवस सातत्याने बघायचं, गाणं सुरू असताना हिरो-हिरोईनच्या मागील आनंदी, भावनिक वलय, दृश्य, नेपथ्य, टेक्निकल, फोटोग्राफी यांचा त्यात महत्वाचा भाग कसा ते टिपून अजिता यांनी 120 पानांचं "पडद्या मागचं गाणं" हे वेगळ्या धाटणीतील पहिले पुस्तक लिहले आहे. 

अजिता साने-सोनाले लिखित पडद्यामागचं गाणं या पुस्तकाचं प्रकाशन ख्यातनाम लेखिका मल्लिका अमरशेख यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, मराठी भाषा अभ्यासक नीतिन आरेकर, सेन्सॉर बोर्डाचे माजी सीईओ ए. रामकृष्णन, भारत सरकारच्या माहिती प्रसारण विभागाचे माजी विभागीय संचालक विजयकुमार गवई यांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

कायद्याने वागा या लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांच्या माणूस प्रकाशनाचं हे पहिलंच पुस्तक आहे. पुस्तकाची प्रस्तावना नीतिन आरेकर यांची असून, चित्रपटगीतांचं आशयसंपन्न आकलन, असं त्यांनी या पुस्तकाचं कौतुक केलं आहे. हे पुस्तक रसिकांचा चित्रपटगीतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्या शिवाय राहणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया नामवंत कवयित्री वृषाली विनायक यांनी दिली आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे व प्रकाशनाच्या निमित्ताने पुस्तक खरेदीच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक कमलेश सोनाले यांनी केलं आहे. मल्लिका अमरशेख यांनी पुस्तक चाळलं. असे पुस्तकच याआधी कधी आले नाही. जुन्या सिनेमांच्या गाण्यांची आवड आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या विषयावर बोलायला मिळतेय. आणखीन 50 गाण्यांचं पडद्यामागचं गाणं लिहण्याची प्रेरणा देऊन त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप मारली.असे अजिता साने-सोनाले यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com