तुमच्या आंदोलनाशिवाय त्यांना जाग आली नाही: राज ठाकरे

मंगळवार, 20 मार्च 2018

राज ठाकरे म्हणाले, की मुंबईकरांना आज थोडा त्रास झाला. पण, तुम्ही हे स्वयंस्फूर्तीने केले. त्याशिवाय त्यांना जाग आली नाही. 

मुंबई : "रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात आज तुम्ही आंदोलन केले नसते त्यांना जाग आली नसती. आम्ही दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडू," असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. विद्यार्थ्यांनी माटुंगा येथे लोकल वाहतूक रोखून धरली होती. माटुंगा येथे विद्यार्थ्यांनी लोकलसेवा रोखून धरल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीमार करावा लागला होता, तसेच दगडफेकही झाली होती. या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमीही झाले होते. लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

राज ठाकरे म्हणाले, की मुंबईकरांना आज थोडा त्रास झाला. पण, तुम्ही हे स्वयंस्फूर्तीने केले. त्याशिवाय त्यांना जाग आली नाही. तुम्ही जेव्हा आपल्या मागण्या मांडाल तेव्हा योग्य पद्धतीने मांडा. मनसेच्या नेत्यांसोबत मी या विषयावर चर्चा करेल. तुम्हाला घेऊन शिष्टमंडळ दिल्लीला जाईल आणि तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. मनसे तुमच्यासोबत आहे.

Web Title: marathi news raj thackeray supports Railway Exam Students Agitation In Dadar