कल्याण: रिक्षा-टॅक्‍सीत माहिती लावली नाही तर होणार कारवाई

रविंद्र खरात
मंगळवार, 27 जून 2017

रिक्षा-टॅक्‍सीच्या डायव्हर सीटच्या मागे नामफलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात वाहनाचा नंबर, परवाना धारकाचे नाव, परवाना धारकाचा पत्ता, परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, मोबाईल नंबर, चालकाचे नाव, चालकाचा पत्ता, वाहन चालक परवाना क्रमांक, चालक परवाना मुदत, वाहन चालकाचा मोबाईल नंबर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कल्याण - कल्याणमधील रिक्षाचालकांकडून प्रवाशांचे भाडे नाकारणे, वाढीव भाड्याची मागणी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, महिला प्रवाशांची छेडछाड करणे, विनयभंग असे प्रकार घडत असल्याने रिक्षाचालकांविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये चालक-मालकासह अन्य सविस्तर माहिती आढळून आली नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी "सकाळ'शी बोलताना दिली आहे.

रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये बऱ्याचदा वादाची परिस्थिती निर्माण होते. काही वेळा हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचते. गुन्हेही दाखल होतात. मात्र असा वादावर नियंत्रण बसावे म्हणून शहरातील वाहतूक शाखेने कारवाईचा इशारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीतील शहरी आणि ग्रामीण भागात रिक्षाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून दादागिरी करताना आढळून येतात. गणवेश न घालणे, विनापरवाना रिक्षा चालवणे, अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवासी वर्गाशी सुट्ट्या पैश्‍यावरुन हुज्जत घालणे, प्रसंगी प्रवासी वर्गाला मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा रिक्षाचालकांमुळे प्रामाणिकपणाने प्रवाशांना सेवा देणाऱ्या सामान्य रिक्षाचालकांचीही बदनाम होत असते. त्यामुळे दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर सामान्य रिक्षाचालक टीका करू लागले आहेत. अशा रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून शहरातील ऑटो रिक्षा-टॅक्‍सीच्या डायव्हर सीटच्या मागे नामफलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात वाहनाचा नंबर, परवाना धारकाचे नाव, परवाना धारकाचा पत्ता, परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, मोबाईल नंबर, चालकाचे नाव, चालकाचा पत्ता, वाहन चालक परवाना क्रमांक, चालक परवाना मुदत, वाहन चालकाचा मोबाईल नंबर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासोबतच परवाना धारकाचा फोटो, वाहन चालकाचा फोटो लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवासांच्या आत रिक्षा-टॅक्‍सीमध्ये हे फलक न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे .

प्रवाशांसाठी मदत कक्ष क्रमांक
प्रवासी वर्गाला टॅक्‍सी आणि रिक्षा प्रवास करताना काही अडचण निर्माण झाली तर त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
■ पोलिस मदत क्रमांक 100
■ महिला हेल्प लाईन क्रमांक 103
■ पोलिस मदत 8286300300 आणि 8286400400
■ आरटीओ मुंबई हेल्प लाइन नंबर 1800220110
■ आरटीओ ठाणे हेल्प लाईन नंबर 18002255335

रिक्षा आणि टॅक्‍सी चालकांनी प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागावे. वाहनात नामफलक लावणे बंधनकारक असून 15 दिवसानंतर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त धडक कारवाई सुरु होणार आहे.
- वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड

Web Title: marathi news sakal news maharashtra news kalyan news rikshaw auto rikshaw public transport