श्रीदेवी यांना साश्रुनयनांनी निरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर विले-पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत बोनी कपूर यांनी अंत्यसंस्कार केले. 
लाडक्‍या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच चाहते आणि सेलिब्रिटी तिचे अंत्यदर्शन घेत होते. दुपारी पांढऱ्या फुलांनी सजविलेल्या एका ट्रकवर तिचे पार्थिव ठेवण्यात आले आणि तो ट्रक जेव्हा लोखंडवाला येथून पवनहंस येथील स्मशानभूमीकडे निघाला, तेव्हा चाहत्यांचा शोक अनावर झाला होता. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर विले-पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत बोनी कपूर यांनी अंत्यसंस्कार केले. 
लाडक्‍या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच चाहते आणि सेलिब्रिटी तिचे अंत्यदर्शन घेत होते. दुपारी पांढऱ्या फुलांनी सजविलेल्या एका ट्रकवर तिचे पार्थिव ठेवण्यात आले आणि तो ट्रक जेव्हा लोखंडवाला येथून पवनहंस येथील स्मशानभूमीकडे निघाला, तेव्हा चाहत्यांचा शोक अनावर झाला होता. 
श्रीदेवी यांचे पार्थिव काल रात्री उशिरा दुबईतून मुंबईत आणण्यात आले. आज सकाळी साडेनऊ वाजता लोखंडवाला येथील सेलिब्रेशन क्‍लबमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केवळ मुंबईतूनच नाही, तर बाहेरगावाहून आपल्या लाडक्‍या अभिनेत्रीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो चाहते आले होते. श्रीदेवी यांच्या कन्या जान्हवी आणि खुशी, अर्जुन कपूर, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान, जया बच्चन, ऐश्‍वर्या राय-बच्चन, भूमिका चावला, रेखा, हेमामालिनी, ईशा देओल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, काजोल, जॅकलिन फर्नांडिस, सुष्मिता सेन, चिरंजीवी, अमृता सिंग, सारा अली खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, मीरा राजपूत, हिमेश रेशमिया, जॉन अब्राहम, राजकुमार राव, नील व नितीन मुकेश, इम्तियाज अली, फराह खान, अन्नू कपूर, अरबाज खान, सुभाष घई, रविकिशन, भप्पी लहिरी, सतीश कौशिक, करिष्मा तन्ना आदी मंडळींनी सेलिब्रेशन क्‍लबमध्ये अंत्यदर्शन घेतले. तसेच विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी अर्जुन रामपाल, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, फरहान अख्तर, दीया मिर्झा, साहिल संघा, अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, प्रसून जोशी, शाहरुख खान, आमीर खान, महेश भूपती, शक्‍ती कपूर, उद्योगपती अनिल अंबानी, प्रकाश महेता, अनुपम खेर आदी उपस्थित होते.
श्रीदेवी यांना पांढरा रंग आवडायचा. त्यामुळे त्यांची इच्छा होती, की त्यांच्या अंत्ययात्रेवेळी जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर केला जावा. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या अवतीभवती पांढरे कापड लावण्यात आले होते. तसेच पांढऱ्या फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा सेलिब्रेशन क्‍लबपासून पवनहंस स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. या वेळी असंख्य चाहते श्रीदेवी यांना निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झाले. अंत्ययात्रेला तुफान गर्दी झाल्यामुळे विलेपार्लेकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दी पाहता स्मशानभूमी बाहेरही मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
चेन्नई आणि हैदराबादवरून चाळीस बसमधून चाहते अंत्यदर्शनासाठी मुंबईत दाखल झाले होते. सगळ्याच चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. नवधूप्रमाणे ते सजविण्यात आले होते. सोनेरी आणि लाल रंगाची साडी नेसविण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून श्रीदेवी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. तमिळनाडूतील पंडितांकडून अंत्यविधी करण्यात आले.

चौकट
सेलिब्रिटींना गराडा
श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेऊन काही सेलिब्रिटी जेव्हा आपल्या गाडीतून परत निघत होते, तेव्हा त्यांच्या गाडीभोवती काही चाहते गराडा घालत होते. त्यांचा फोटो काढण्यासाठी धडपड दिसत होती. पोलिस त्यांना अटकाव करीत होते. परंतु काही चाहते बेभान झाले होते. गाडीसमोरूनही हटत नव्हते. साहजिकच त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Web Title: marathi news Sridevi funeral