न्याय व्यवस्था बहिरी, आंधळी करू नका : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई : सरन्यायाधीशांच्या कारभारावर आक्षेप नोंदवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कौतुक केले. न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. न्याय व्यवस्था बहिरी आणि आंधळी करण्याचे काम करू नये, असा टोला लगावत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणीही उद्धव यांनी केली. 

शिवसेना भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव म्हणाले, की न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेणे धक्कादायक आहे. तरीही या चार न्यायाधीशांचे कौतुक झाले पाहिजे. मुळात त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता आणि या विषयाचे राजकरण न करता तक्रारींचा निवाडा व्हायला हवा. या न्यायाधीशांवर कदाचित कारवाई होईल; पण ती पक्षपाती असू नये. देशातील काही लोक आपली जबाबदारी पार पाडत आहेत का, हा प्रश्‍न आहे. फक्त निवडणुका जिंकणे म्हणजेच कारभार होत नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी या वेळी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई भेटीवर येत आहेत. त्याबाबत त्यांना विचारले असता, राष्ट्रपती मुंबईत यावेत, असे काय काम आहे, असा सवाल त्यांनी केला. 
 
कोपर्डी पीडितांचे उद्धव यांना गाऱ्हाणे 
कोपर्डीतील पीडितेच्या पालकांनीही शनिवारी उद्धव यांची शिवसेना भवनात भेट घेतली. या खटल्यात आरोपींनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पीडितेच्या बाजूने खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची शिफारस करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्‍वासन उद्धव यांनी दिले.

उपस्थित ग्रामस्थांनी कोपर्डीजवळील कुळधरण पोलिस चौकी आणि बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी केली. शैक्षणिक उपक्रमांबाबत येणाऱ्या अडचणी शिवसेनेतर्फे सोडवल्या जातील, अशी ग्वाही उद्धव यांनी ग्रामस्थांना दिली. 

Web Title: marathi news Supreme Court Chief Justice Dipak Misra Indian Judiciary Uddhav Thackray