पोलिस अधिका-याला वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न 

दिलीप पाटील 
रविवार, 14 जानेवारी 2018

वाडा - वाडा तालुक्यातील चिंचघर येथील एका तरुणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 10 जाने) सायंकाळी घडली. गेले चार दिवस उलटूनही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस अधिका-याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. हीच घटना दुसर्‍या कोणाच्या बाबतीत घडली असती तर तत्काळ गुन्हा दाखल केला असता. मात्र एक पोलिस अधिकारीच या प्रकरणात अडकल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला जात  असल्याचा आरोप केला जात आहे. 

वाडा - वाडा तालुक्यातील चिंचघर येथील एका तरुणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 10 जाने) सायंकाळी घडली. गेले चार दिवस उलटूनही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस अधिका-याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. हीच घटना दुसर्‍या कोणाच्या बाबतीत घडली असती तर तत्काळ गुन्हा दाखल केला असता. मात्र एक पोलिस अधिकारीच या प्रकरणात अडकल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला जात  असल्याचा आरोप केला जात आहे. 

वाडा तालुक्यातील चिंचघर येथील कृपाल पाटील (वय 28) या तरुणाचे नजीकच्या गावातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र तिचे आणखी दोन तरुणांशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर कृपाल आणि त्या तरुणीत वाद झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी कुडूस पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवारे यांच्याकडे तोंडी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर कृपाल याला 22 डिसेंबर 2017 ला पोलिसांनी चौकीत बोलावून त्याला मारहाण केली. शिवाय खोटा गुन्हा दाखल करुन तुला जेलमध्ये टाकू, असा सज्जड दम भरुन दोन लाखांची मागणीही केली. कृपाल याने घाबरून 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत एक लाख रुपये पोलिस अधिका-याला दिले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन त्याचा छळ  पोलिस करु लागले. अखेर या जाचाला कंटाळून कृपाल याने गेल्या बुधवारी सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला  उपचारासाठी अंबाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्यापही त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवून सोशल मीडियावर व्हायरल केली. या सुसाईट नोटची पालघरचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी दखल घेऊन रणवारे यांना तडकाफडकी निलंबित केले व त्यांची विभागीय चौकशी सुरु केली. चार दिवस होऊनही वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. घटना घडल्यानंतर लागलीच पोलिस अंबाडी येथील दवाखान्यात जाऊन तरुणाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच दुसर्‍या दिवशी या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा पालघर गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक हेगाजे यांनीही रुग्णालयात जाऊन चौकशी केली. मात्र अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाडा पोलिस पालघर पोलिसांकडे तर पालघर पोलिस वाडा पोलिसांकडे बोट दाखवून चालढकल केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर का? असा सवाल आता नागरिक करु लागले आहेत. एकंदरीत या प्रकरणात पोलिस अधिका-याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत असून चौकशी वगैरे हा सगळा फार्स असल्याचे बोलले जात आहे.   
               

गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा 
गेल्या बुधवारी ही घटना घडली असताना आतापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. गोरगरीब जनतेला पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी पोलिस प्रशासनाला दिला असून त्याबाबतचे निवेदन सोमवारी (दि. 15) पालघरच्या पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. अशी माहिती वनगा यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Web Title: marathi news thane boy suicide case police involved