कोपरीची वाहतूक कोंडीतून सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

ठाणे - कोपरीच्या वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानक (पूर्व), रेल्वेस्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. सध्या येथील अरुंद रस्त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस मुख्य रस्त्यावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे.

ठाण्यातील लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून लवकरच या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील जागेचा (रेल्वे स्थानकावरील एअर स्पेस) वाणिज्यिक विकास करून प्राप्त होणारा निधी ठाणे रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी वापरण्याचा प्रस्ताव मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि.च्या माध्यमातून तयार झाला होता. या प्रस्तावमध्ये विहित चटईक्षेत्र निर्देशाकांपेक्षा जास्त चटईक्षेत्र वापरणे प्रस्तावित असल्याने तो राज्य सरकार आणि पालिकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. 

या प्रकल्पातंर्गत तीन कि.मी. लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार असून ठाणे रेल्वेस्थानक (पूर्व) ते द्रुतगती मार्गास थेट जोडण्याबरोबरच नवीन प्रस्तावित उपनगरीय स्थानकालाही जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेथील आठ हजार ९१२ चौरस मीटर मोकळ्या जागेवर साडेसहा मीटरचा डेक बांधण्यात येणार असून हा डेक स्टेशन, पादचारी पुलासोबत जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर या डेकवर सार्वजनिक वाहतुकीचा बस थांबाही ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांना दिलासा मिळणार
 ठाणे पूर्वेकडील भागात गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर रोड येथील खासगी बसेसचा राबता वाढलेला आहे. तसेच स्थानकाला लागूनच टीएमटीचा थांबा आणि रिक्षा थांबाही आहे. 

 रस्ता आधीच अरुंद असल्याने टीएमटीच्या बस, खासगी बस आणि खासगी वाहने सकाळी आणि सायंकाळी कामाच्या वेळेत एकाच वेळी रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडी होते. 

 कोपरीतील स्थानकालगतचे रस्ते मुळातच अरुंद असल्याने मुख्य रस्त्यावरही वारंवार वाहतूक कोंडी होते. अशा वेळी या नव्या प्रकल्पामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Web Title: marathi news thane kopari traffic