राष्ट्रवादीतील बंडाळी, मुस्लिम मतांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेला.

Marathi News Thane News General Election of the Jawahar Municipal Council
Marathi News Thane News General Election of the Jawahar Municipal Council

मोखाडा - जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडाळी आणि मुस्लिम समाजाच्या मतांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेला झाला आहे. तर शिवसेनेने गतवेळी केलेल्या चुका सुधारुन, योग्य मोर्चे बांधणी केल्याने थेट मतदारांकडून नगराध्यक्ष पदी चंद्रकांत पटेल यांच्यासह 9 नगरसेवक निवडून आणले आहे. तसेच राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून भगवा फडकविला आहे. 

ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जव्हारची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1918 मध्ये जव्हार नगरपरिषदेची स्थापना झाली. यंदा नगरपरिषदेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे महत्त्व वाढले होते. गतवेळी जव्हारच्या मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवत, 17 पैकी 14 जागा त्यांच्या पारड्यात टाकल्या होत्या. मात्र, अवघ्या दोन वर्षाच्या आत नगराध्यक्षांच्या मनमानीचे कारण देत 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्याची न्यायालयीन लढाई झाली. स्वपक्षाच्या भानगडीत सत्ताधाऱ्यांचे जव्हारच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. तेथूनच राष्ट्रवादीला उतरती कळा लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ 6 जागा जिंकता आल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत मतदारांकडून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दिलीप तेंडुलकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र ती पक्षाने नाकारली आणि तेथेच राष्ट्रवादीच्या पराभवाची ठिणगी पडली. राष्ट्रवादीने पुन्हा विद्यमान नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनाच उमेदवारी दिली होती. लयास गेलेल्या काँग्रेसने ही संधी साधून उभारी घेण्यासाठी दिलीप तेंडुलकर यांना पाठिंबा जाहीर करत काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले. दिलीप तेंडुलकर यांच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाच्या मतदानाची विभागणी झाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार दिलीप तेंडुलकर यांना 1399 तर राष्ट्रवादीचे संदिप वैद्य यांना 1317 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे विजयी उमेदवार चंद्रकांत पटेल यांना 1768 मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे जव्हार प्रतिष्ठानचे उमेदवार भरत पाटील यांना 1576 मते मिळाली आहेत. दिलीप तेंडुलकर आणि संदीप वैद्य यांच्या मतांची बेरीज एकत्र केल्यास 2716 होते. त्याचा मोठा फायदा शिवसेनेला झाला आहे. 
दरम्यान, शिवसेनेने गतवेळी केलेल्या चुका सुधारुन, नव्या उमेदीने प्रचार करत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरविले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांची दणदणीत सभा घेतली. संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, राजेश शहा आणि माजी नगराध्यक्ष दिनेश भट, व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबविली आणि नगराध्यपदी चंद्रकांत पटेल यांच्यासह 9 नगरसेवक निवडून आणले आणि राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेतली आहे.

मुस्लिम मतांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेला झाला...
थेट नगराध्यक्ष निवडीसाठी मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार होती. एकूण 8013 मतदारांपैकी सुमारे दोन हजारहून अधिक मते मुस्लिम समाजाची आहेत. ही मते दिलीप तेंडुलकर आणि संदीप वैद्य यांच्यासह भरत पाटील यांच्यात विभागली गेली आहेत. जव्हार प्रतिष्ठानने या निवडणुकीत नव्याने मोठे आव्हान उभे करत मुस्लिम मते आपल्याकडे आकर्षित केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ते दुसर्‍या क्रमांकावर राहीले. तर काँग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर तिसऱ्या आणि राष्ट्रवादीचे संदिप वैद्य चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. यामध्ये शिवसेनेला त्यांच्या हक्काच्या मुस्लिम मतानेही हातभार लावला आहे.

भाजप इन, काँग्रेस आऊट
या निवडणुकीत भाजपचे कुणाल ऊदावंत यांनी प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रथमच नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडून येऊन प्रवेश केला आहे. तर गतवेळी काँग्रेसचा एक नगरसेवक नगरपरिषदेत होता. मात्र, यावेळी दिलीप तेंडुलकर सारखा नगराध्यक्षपदाचा उमेदवार साथीला असतांना त्याचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. अंतर्गत पाडापाडीच्या राजकारणामुळे नगरपरिषदेत काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com