विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

ठाणे - स्वच्छ व सुंदर ठाणे या उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या अंतर्गत पालिका शाळांमध्येही स्वच्छता राखली जाईल, यासाठी पालिकेने विविध उपाययोजना शाळांमध्ये राबविल्या आहेत. पालिका शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी आता शाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. मार्च अखेरीस शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येईल, अशी माहिती समाजविकास विभागातर्फे देण्यात आली. 

ठाणे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रप्रणालीचा उपयोग करत शिक्षण देण्याबरोबरच मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, म्हणूनही पालिकेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. त्यासोबतच आता महिला व बालकल्याण विभाग योजनेंतर्गत शाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये या मशीन बसवण्यात येणार आहेत. यासाठी साधारण ६० ते ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आली आहे. कंत्राटदारांनी निविदा भरल्यास त्यांच्यातील योग्य कंत्राटदारांकडे हे काम सोपवून लवकरात लवकर शाळांमध्ये या यंत्रणा बसवण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे; परंतु मुले मुख्यतः घरूनच पाण्याच्या बाटल्या आणतात. घरी गाळून उकळलेले पाणी तसेच अद्ययावत मशीनच्या सहाय्याने शुद्ध केलेले पाणी पिण्यावरच मुलांचा भर असतो; परंतु दिवसभर बाटलीमधील पाणी मुलांना पुरत नाही; परिणामी ते पाणी कमी पितात. पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना भेडसावतात. शाळेतच त्यांना शुद्ध पाणी मिळाल्यास आरोग्याकडे लक्ष देत, नक्कीच मुले योग्य प्रमाणात पाणी घेतील. यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राखले जाईल. तसेच पालिका शाळांविषयीची पालकांच्या मनात तयार झालेली मानसिकताही बदलेल. खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सर्व सोईसुविधा पालिका शाळांमध्येही मिळाल्यास याकडे पालकांचा ओढा वाढेल. तसेच समाजातील सर्व स्तरातील मुलांना अद्ययावत, असे शिक्षण आणि सुविधा मिळतील, असा विश्‍वास पालिका प्रशासनाने या वेळी व्यक्त केला. 

पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी महिला व बालकल्याण विभागांतर्गत शुद्ध पाणी व्यवस्था योजना आखण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्वरित पालिका शाळांमध्ये शुद्ध पाणी यंत्रणा बसवण्यात येईल. मार्च अखेरीस शाळांमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- एस. आर. पाटोळे, समाज विकास अधिकारी.

Web Title: marathi news thane student water