किरकोळ दुरुस्तीसाठी महागड्या बस धुळीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

ठाणे - किरकोळ दुरुस्तीसाठी टीएमटीच्या बस आगारात पडून राहणे आता नेहमीची बाब होऊ लागली आहे. किरकोळ दुरुस्तीसाठी तब्बल १२ एसी व्हॉल्व्हो बस गेल्या दीड महिन्यापासून आगारात धूळ खात पडून आहेत. गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्या वेळी संबंधित ठेकेदारांची बिले वेळेवर दिली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठाणे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसेसपैकी केवळ १८५ बस आज रस्त्यावर धावत आहेत. त्यातील २० ते २५ बस रोज ब्रेकडाऊन होऊन आगारात येत असल्याचा मुद्दा सदस्य राजेश मोरे यांनी मांडला. याचबरोबर १०० बस या किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात पडून आहेत. त्या बसची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला; परंतु एसी बसचे उत्पन्न जास्त असतानाही १२ बस बंद अवस्थेत का आहेत, त्या केव्हापासून आगारात पडून आहेत, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला. त्या वेळी शिवसेनेचे सदस्य राजेंद्र महाडीक यांनी या बस तब्बल दीड महिन्यापासून केवळ किरकोळ दुरुस्तीसाठी बंद असल्याची माहिती दिली. या बस बंद असल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. हे बुडालेले उत्पन्न कोण भरून देणार, असा प्रश्‍न या वेळी सदस्यांनी केला. यावर परिवहननेदेखील केवळ आधीची बिले वेळेवर न निघाल्यानेच या बसची दुरुस्ती होऊ शकली नसल्याची माहिती दिली. तसेच या बस लवकरात लवकर दुरुस्त केल्या जातील, असे आश्‍वासन दिले. १०० बस टप्प्या-टप्प्याने दुरुस्त करून त्याही रस्त्यावर आणल्या जातील, अशी माहिती या वेळी देण्यात आली. वारंवार प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी निधी नसल्याची ओरड केली जात असली तरी गेल्या काही महिन्यात बस दुरुस्तीसाठी तब्बल दीड कोटींचा खर्च करण्यात आला असून, त्यानंतर मोजक्‍या बस रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित बस कुठे गेल्या, खर्च कुठे केला गेला, असा प्रश्‍न राजेश मोरे यांनी केला.

Web Title: marathi news thane TMT bus