तिकीट दराऐवजी सुविधांत वाढ

तिकीट दराऐवजी सुविधांत वाढ

ठाणे - तिकीट दरवाढ न सूचवणारा २०१७-१८ चा सुधारित आणि २०१८-१९ चा ३५२ कोटी ८१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक असलेला अर्थसंकल्प महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी परिवहन समितीला गुरुवारी (ता.१५) सादर केला. अर्थसंकल्पामध्ये परिवहनचे उत्पन्न वाढवण्यासाठी बसथांब्यांवर एलईडी टीव्ही लावून जाहिराती हक्क देणे, परिवहन सेवांच्या जागांवर होर्डिंग्जला परवानगी, चौक्‍यांवर जाहिरात हक्क देणे, एटीएम सेंटर सुरू करणे, डेपोत सौर उर्जा प्रकल्प राबवून विजेची बचत करणे, बसमध्ये एलईडी लावून जाहिराती, बसवर जाहिराती प्रसिद्ध करणे आदी नव्या-जुन्या योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

संदीप माळवी यांनी आज परिवहन समिती सभापती अनिल भोर यांना अर्थसंकल्प सादर केला. ठाणे परिवहन सेवेचे २०१७-१८ चे २२८ कोटी आठ लाखांचे, तर २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक ३५२ कोटी ८१ लाखांचे आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात २७७ बसपैकी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रतिदिन सुमारे १६५ बस प्रवाशांना मिळणार आहेत, तर जीसीसी ठेकेदारांच्या माध्यमातून १९० बस मिळणार आहेत. त्यानुसार उत्पनाचे प्रमुख स्त्रोत असणाऱ्या प्रवासी भाड्यापोटी १३९ कोटी २२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. 

अंदाजपत्रकातील नावीन्य
ठाणे महापालिका पीपीपीच्या माध्यमातून १०० इलेक्‍ट्रिक एसी बस १० वर्षे चालवण्यासाठी घेणार आहे. त्यातून परिवहनला एका बसमागे महिन्याला १० हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. इलेक्‍ट्रिक बससोबतच ठाणेकरांना जीसीसी तत्वावर १०० वातानुकूलित इथेनॉल इंधनावर धावणाऱ्या बसही मिळणार आहेत. मार्च अखेर पहिल्या टप्प्यात पाच बस दाखल होणार असून वर्षअखेर ५० बस परिवहनमध्ये सहभागी होणार आहेत. 

स्वतःच्या उत्पन्नावर टीएमटीचा भर
ठाणे पालिकेच्या अनुदानावर कायम अवलंबून राहणाऱ्या परिवहन प्रशासनाने यंदा स्वतःच्या उत्पन्नाच्या मर्यादा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० बस थांबे अत्याधुनिक स्वरूपात असणार आहेत. बस थांब्यांवर टॉयलेट, वायफाय आदींसह इतर सुविधा देतानाच, एलईडीच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय प्रत्येक बसमध्ये एलईडी टीव्ही बसवून त्यावरही जाहिरातीचे अधिकार दिले जाणार आहेत. बस आगारांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत आदी माध्यमातून परिवहनने वार्षिक १५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

अनुदानापोटी २१२ कोटींची मागणी  
परिवहन प्रशासाने ३५२ कोटी ८१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले असले, तरी त्यात २२७.७३ कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले आहे. गेल्या वर्षी १३६.१३ कोटींचे अनुदान मागण्यात आले होते. त्यातही यंदा वाढ करण्यात आली आहे. २२७.७३ कोटींपैकी महसुली खर्चापोटी ९६ कोटी ३४ लाख, भांडवली खर्चासाठी २८ कोटी ४५ लाख, दिव्यांग व इतर संवर्गातील व्यक्तींच्या सवलतीपोटी ११ कोटी २२ लाख तसेच जीसीसी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बस संचालन तुटीपोटी ९१ कोटी ७२ लाख अशी एकूण २२७.७३ कोटींची मागणी करण्यात आली आहे.   

महिलांची सुरक्षा आघाडीवर
महिलांनी अधिक सुरक्षित प्रवास करावा, यासाठी सर्व बसमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात येणार आहेत. शिवाय एखादी महिला बसमधून प्रवास करत असताना तिची छेडछाड जरी काढली गेली, तर प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येणार आहे. ते बटन दाबल्यानंतर तत्काळ महिलांच्या सुरक्षितेसाठी पावले उचलली जाणार आहेत. याशिवाय परिवहनच्या प्रत्येक बसमध्ये प्रवाशांचा विरंगुळा व्हावा हा उद्देश ठेवून शुगर बॉक्‍स बसविले जाणार आहेत. 

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सवलत 
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात ५० टक्के सूट देण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे महापालिका परिसरातील आणि भिवंडी शहरातून महापालिका परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय, १५ वीपर्यंत शिक्षण घेणारे, आयटीआय व तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना परिवहनच्या बसमध्ये ५० टक्के सवलत देणे विचाराधीन आहे. त्यानुसार यातून होणारी तूट एक कोटी ५० लाख अपेक्षित असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची तूट पालिकेकडून अनुदानातून मिळेल अशी अपेक्षा आहे. 

तेजस्विनी बस
केवळ महिलांसाठीही ५० तेजस्विनी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यासाठी सरकारकडून सहा कोटींचा निधी पालिकेकडे जमा झाला आहे. विशेष म्हणजे या बसवर वाहकही महिलाच असणार आहेत. 

ई-तिकिटिंग प्रणाली 
गेली कित्येक वर्षे केवळ घोषणेपुरते राहिलेले ई-तिकीट देण्याचा दावा करण्यात आला आहे. परिवहन वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना बस संदर्भातील तक्रारी थेट करता येणार आहेत. 

दिव्यांगांना मोफत प्रवास
महापालिका परिसरातील दिव्यांग व्यक्तींना परिवहनच्या बसमध्ये आता मोफत प्रवासाची सवलत मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या प्रवास खर्चापोटी होणाऱ्या खर्चाची तरतूद महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे; तर एड्‌सबाधित व्यक्तींनाही बस भाड्यात सवलत देण्यात येणार असून त्यापोटी वार्षिक ३० कोटी ८४ लाख ६०० रुपयांचा बोजा परिवहनवर पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com