कल्याण रेल्वे हद्दीत बेकायदा पार्किंग करणारांवर कारवाई

रविंद्र खरात
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

सुरक्षा बल आणि स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाकडून कल्याण वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करताच कल्याण वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून दुचाकी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली.

कल्याण : कल्याण रेल्वेच्या हद्दीत बसणाऱ्या फेरीवाले विरोधी कारवाई नंतर आता बेकायदेशीर वाहने पार्क करून प्रवाश्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केल्याने प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि परिसर फेरीवाले मुक्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता आणि फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याने अनेक ठिकाणी आंदोलन ही झाली होती. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक फेरीवाले मुक्त करण्यात आला आहे.आता रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर दुचाकी वाहन पार्क केल्याने स्टेशन गाठण्यास सर्व सामान्य प्रवाश्यांना अडथळा निर्माण झाला होता. 

सुरक्षा बल आणि स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाकडून कल्याण वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करताच कल्याण वाहतूक पोलिसांनी मंगळवार ता. 21 पासून दुचाकी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे काही काळ प्रवाश्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र ही कारवाई सातत्याने झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.
'स्टेशन असो पालिका हद्द असो नागरीक आणि प्रवाश्यांना आवश्यक असलेल्या सुविधा देणे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य असून एक दिवस नव्हे, तर ही कारवाई सातत्याने केल्यास वाहन चालकांना शिस्त लागेल' असे मत प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी व्यक्त केले.  

'प्रवासी वर्गाला स्टेशन गाठणे कठीण होत होते. रेल्वेच्या विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाने पार्कींग क्षेत्रात आपली वाहने पार्क करावी आणि वाहतूक पोलीस ही सातत्याने कारवाई करतील' अशी माहिती कल्याण रेल्वेस्थानक स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली. 
स्टेशन मास्तर आणि सुरक्षा बलाच्या मागणीनुसार रेल्वेस्थानकच्या हद्दीत बेकायदा 50 हून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून, कालपासून केली असून पुढे ही चालू राहणार असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathi news Traffic police action against unauthorized vehicle park workers in Kalyan railway station area