वृक्षतोडीस शिवसेनेचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - विकास प्रकल्पांच्या नावाखाली वृक्ष तोडण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल 1100 वृक्ष तोडण्याचे प्राधिकरणाच्या बैठकीतील प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविले. वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना दिल्यामुळेच प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोपही शिवसेनेने केला. 

मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रोसह रस्ता-नाला रुंदीकरण, नवीन रस्ते आणि विविध विकास प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध घातले होते. दरम्यान, पालिकेने तब्बल 3070 वृक्ष तोडण्याचे 12 प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या मागील बैठकीत ठेवले होते. या वेळीही शिवसेनेच्या विरोधामुळे सर्व प्रस्ताव परत पाठवण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा वृक्ष तोडण्याचे चार प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आले; मात्र विकासाच्या नावाखाली वृक्षांची बेसुमार तोड करू देणार नाही, अशी भूमिका मांडून सर्व प्रस्ताव परत पाठवल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली. पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्षांची बेसुमार तोड केली जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पालिकेच्या हद्दीतील वृक्षांची पाहणी प्राधिकरणाचे सदस्य करीत होते; मात्र आता या पाहणीवर बंदी का आणली, असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेचा विकासाला विरोध नाही; मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास केला जात असेल तर शिवसेना विरोधच करेल, असे ते म्हणाले. गेल्या 10 महिन्यांत किती वृक्ष आयुक्तांनी मनमानीपणे आपल्या अधिकारात तोडले, किती वृक्षांचे पुनर्रोपण झाले याची माहिती सादर करा, अशी मागणीही त्यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत केली. 

Web Title: marathi news tree cutting shivsena mumbai