'कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली'

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

मुंबईतील आझाद मैदानासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी 'आमच्या भगिनीला श्रद्धांजली' अशा आशयाचा बॅनर लावून पुष्पांजली अर्पण करीत श्रद्धांजली वाहीली.

मुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. आरोपींना अटक झाली. खटला उभा राहिला आणि आज अहमदनगर सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा आज निकाल लागला. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला असून कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणी आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, नितीन गोपीनाथ भैलूमे व संतोष गोरख भवाळ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी
'आमच्या भगिनीला श्रद्धांजली' अशा आशयाचा बॅनर लावून पुष्पांजली अर्पण करीत श्रद्धांजली वाहीली. या प्रसंगी उल्का विश्वासराव, वीरेंद्र पवार, अभिजीत घाग, मंदार जाधव, दिलीप सिंह जगताप, राहुल गावडे, वीरेंद्र पवार यांच्यासह मुंबई, वाशी आणि ठाणे येथून जवळपास 90 ते 100 लोक आले होते. पोलिस उपायुक्त डॉ. मनोज कुमार शर्मा, सहाय्यक आयुक्त विजय कदम आणि आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत वाखारे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news tribute to kopardi victim at mumbai