उल्हासनगरातील बोटक्लबमध्ये अनेक शिल्पांची विटंबना

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : गेल्या 37 वर्षांपासून उल्हासनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या बोटक्लब मधील भारतमातेसह अनेक शिल्पे ही कचरा गाड्यांच्या, घाणीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात सापडल्याने या शिल्पाची विटंबना होत असल्याचा पर्दाफाश, कायद्याने वागा या लोकचळवळ संघटनेचे सर्वेसर्वा राज असरोंडकर यांनी मासमीडियावर केला आहे. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने बोटक्लबची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

37 वर्षांपासून पालिकेची बोटक्लब ही वास्तू असून अलीकडच्या काळात ती दुर्लक्षित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. कचरा गाड्या उभ्या केल्या जात आहेत. 1980 मध्ये जनसंघाचे प्रल्हाद अडवाणी हे नगराध्यक्ष असताना त्यांनी भारतमातेसह प्रभू रामचंद्र, झान्सी की राणी, महाराणा प्रताप अशी अनेक शिल्पे बोटक्लब मध्ये उभारली होती. विशेष तेव्हा नगरपरिषद असताना केवळ 4 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असतानाही अडवाणी यांनी शिल्पांसाठी तरतूद केली होती. मुळात पुढे या आकर्षक अशा शिल्पांमूळे बोटक्लबला पर्यटन स्थळाचा दर्जा देणे अपेक्षित होते. मात्र त्याकडे सपशेल पणे डोळेझाकपणा करण्यात आल्याने आणि येथे चक्क कचरा गाड्या उभ्या केल्या जात असल्याने आणि त्यामुळेच अस्वच्छता पसरल्यामुळे डुक्करांचा वावर वाढला आहे. या ढिसाळपणामुळे भारतमातेचा श्वास कोंडला जात आहे, अशी पोस्ट सोशल मिडियावर कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी व्हायरल केली होती. त्याचे पडसाद उमटले. 

महापौर मीना आयलानी, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी या प्रकाराची दखल घेतली आणि उपमहापौर जीवन इदनानी, आरोग्य विभागाचे मुख्य विनोद केणे आणि राज असरोंडकर यांच्या सोबत बोट क्लबची पाहणी करून बोटक्लबच्या परिसराची आणि शिल्पांची कचरा, घाण तसेच झाडाझुडपांच्या विळख्यातून सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच संरक्षक भिंत बांधण्याचे व लगतच्या वस्तीतील सांडपाण्याचा बोट क्लबमध्ये होणारा निचरा बंद करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश महापौर आयलानी यांनी दिले. येत्या अर्थसंकल्पात बोट क्लबच्या नुतनीकरणासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्त निंबाळकर यांनी दिले. यावेळी स्थायी समिती सभापती कंचन लुंड, नगरसेवक शेरी लुंड, मनसेचे प्रदिप गोडसे, संजय घुगे, दिलीप थोरात, बंडू देशमुख, मैनुद्दीन शेख, सचिन बेंडके, अशोका फौंडेशनचे शिवाजी रगडे उपस्थित होते.

"कोनशिलेच्या नशिबीही 68 वर्षांपासून विटंबनाच"
दरम्यान 1949 मध्ये स्थापित करण्यात आलेली उल्हासनगर स्थापनेची कोनशीला तरणतलावाच्या चार भिंतीतील कोंडवाड्यात बंदिस्त आहे. आता या ठिकाणी सुसज्ज बांधकाम सुरू असून ते पूर्णत्वाच्या समीप आहे. मात्र कोनशीलेची त्यात अडकण्यासारखी स्थिती झालेली आहे. जी उल्हासनगर शहराच्या स्थापनेची कोनशीला आहे ती पालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रथमदर्शनी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र चार भिंतीच्या कोंडवाड्यात गुदमरून दिवस महिने वर्ष काढणाऱ्या या कोनशिलेची विटंबना थांबणार कधी? असा सवाल या कोनशिलेच्या स्थापनेचे साक्षीदार घनश्याम बठीजा यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com