‘यूपीए’ने प्रकल्प लटकविले

‘यूपीए’ने प्रकल्प लटकविले

नवी मुंबई - ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील सर्वांत मोठे पहिले ग्रीनफिल्ड ठरेल,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘अटकाना, लटकाना और गटकना’ यातच मागील सरकारला रस होता. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याची टीका त्यांनी या वेळी काँग्रेसवर केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जेएनपीटीतील चौथ्या बंदराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबईतील कोंबडभुजे गावाजवळ प्रस्तावित विमानतळाच्या जागेवर हा सोहळा झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री अशोक गणपती राजू, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोदींनी विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण केले. रिमोटचे बटन दाबून त्यांनी ‘जेएनपीटी’तील चौथ्या बंदराचे लोकार्पणही केले. परदेशात लवकरात लवकर माल पोचवण्यासाठी जलवाहतूक व हवाई वाहतूक महत्त्वाची असून, आपण अधिक प्रभावीपणे दळवळणाच्या सुविधा राबवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

नवी मुंबई विमानतळ रखडण्यासाठी त्यांनी पूृर्वीच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले. हे विमानतळ होणार असल्याचे २० वर्षांपासून ऐकत आलो आहे. या चर्चेत अनेक खासदार व आमदारही निवडून आले; परंतु नुसते बोलून विमानतळ होत नसते. मागील सरकारच्या कामाची पद्धत चुकीची होती. प्रकल्प रखडवणे, अडकवण्यातच त्या सरकारला अधिक रस होता. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले. आम्ही सत्तेवर आल्यापासून त्यांची रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. प्रगती योजना राबवून रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत ही कामे पूर्ण करण्यावर आमचे सरकार भर देत आहे, असे मोदी म्हणाले.

मागील सरकारला साधे हवाई धोरणही तयार करता आले नव्हते. त्यामुळे हवाई क्षेत्रात देश मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या आम्ही हवाई क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. देशात पूर्वीपासून ४५० विमानांची मागणी होती. त्यात एक वर्षात आणखी भर पडून नवीन विमानांच्या खरेदीची मागणी तब्बल ९०० पर्यंत पोचली असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. मागील सरकारला केंद्र सरकारकडून आठपैकी एकही ‘एनओसी’ आणता आली नाही. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ती आम्ही काही महिन्यांतच मिळवली. २०१९ पर्यंत विमानतळावरील टर्मिनलची एक इमारत व एक धावपट्टी तयार होऊन तेथून पहिले विमान उडेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या व राज्याच्या विकासदरात एक टक्‍क्‍याने वाढ होईल, असेही ते म्हणाले. 

जेएनपीटी मार्गावर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ ट्रेलर पार्किंगसाठी विशेष प्रकल्प तयार केला जाईल. जेएनपीटीपासून पोर्ट ट्रस्टच्या ट्रेलर पार्किंगला हा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे या मार्गावरील सुमारे एक हजार वाहने कमी होऊन ही कोंडी फुटेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केला. 

‘सागरमाला’तून सव्वा लाख रोजगार! 
केंद्रीय वाहतूक मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘सागरमाला’ योजनेतून कोकणातील सव्वा लाख तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली. सागरमाला योजनेंतर्गत मच्छीमारांना १२ सागरी मैलपेक्षा अधिक खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी ट्रॉलरचे वाटप करण्यात येणार आहे. सीमेन्स कंपनीकडून मच्छीमारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी त्या कंपनीशी १९१ कोटींचा करार केला आहे. सागरमाला योजनेंतर्गत दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पहिले उड्डाण २०२२ पर्यंत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी उपस्थितांना प्रगतीची स्वप्ने दाखवली. या विमानतळावरून २०२२पर्यंत विमान उडताना पाहाल, आमच्या सरकारच्या कारकिर्दीत शिवडी-न्हावा शेवा सी लिंकवरून सागरी वाहतुकीला सुरवात झाल्याचे; तसेच सीएसएमटी ते पनवेल फ्रेड डेडिकेटेड मार्गाचे काम पूर्ण होईल. या कामांच्या वेगात मुंबईतील अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक कधी पूर्ण होईल, ते कळणारही नाही, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com