पाणीचोरांना महापालिकेचा दणका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नवी मुंबई - महापालिकेच्या नळजोडण्यांवर बूस्टर पंप बसवून अतिदाबाने पाणी ओढणारे व बेकायदेशीरपणे नळ बसवून पाणी चोरणाऱ्या ग्राहकांची नळजोडणी रद्द करून पालिका प्रशासनाने दणका दिला आहे. मागील १० महिन्यांत तब्बल १० हजार ग्राहकांच्या नळजोडण्या खंडित केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच यापुढे जलवाहिन्यांवर मोटार पंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा बूस्टर पंपवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.  

महापालिकेच्या आठही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असतानाही अनेकदा कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. अखेर त्याची शहानिशा करण्यासाठी शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व तुर्भे विभागांत नळजोडण्या शोधमोहीम राबविण्यात आली. मागील आठवडाभर सुरू असलेल्या या शोधमोहिमेत पाणी अतिदाबाने खेचण्यासाठी अनेकांनी बूस्टर पंप व मोटार पंप बसविल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी तब्बल १४८ नळजोडण्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या नळजोडण्यांवर बसविण्यात आलेले ६२ बूस्टर पंपदेखील पालिकेने जप्त केले आहेत.

गावठाण व झोपडपट्टी परिसरात पाणी चोरीचे प्रमाण जास्त
मे २०१७ पासून ते आत्तापर्यंतच्या १० महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० हजार ७२० नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या नळजोडण्यांवर अतिदाबाने पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले १६८ बूस्टर पंप काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे पाणी चोरांचे धाबे दणाणले असून नवी मुंबईतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी चोरी व पाणी गळतीच्या अधिकतर तक्रारी येत आहेत. 

फौजदारी गुन्हे दाखल करा
शहरातील सर्व नागरिकांना समान दाबाने समान पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार असून यात कोणी बाधा आणत असेल तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून मागील आठवडाभरात केलेल्या कारवाईत अनेक ठिकाणी बेकायदेशीर नळजोडण्या निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्यावरदेखील कारवाई करण्याचे संकेत रामास्वामी यांनी दिले आहेत.

Web Title: marathi news water theft municipal corporation water connection