केडीएमटीचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना शासन दरबारी पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर 

रविंद्र खरात 
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परीवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी पदभार घेतल्यानंतर उत्पन्न वाढणे आणि बेशिस्त अधिकारी व कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता दिवसेंदिवस केडीएमटी डबघाईला जात असल्याने महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना शासन दरबारी पाठवण्याचा प्रस्ताव परिवहन समितीने शुक्रवार 10 नोव्हेंबरला बहुमताने मंजूर केला.

कल्याण - केडीएमटीच्या डबघाईला जबाबदार महाव्यवस्थापक देविदास टेकाळे असून त्यांना शासन दरबारी पाठवा आणि त्यांच्यासोबत केडीएमटी प्रभारी आगारप्रमुख संदीप भोसले व प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम यांना बडतर्फ करण्याच्या उपसुचनेसह प्रस्ताव आज मंगळवारी (ता. 5) झालेल्या पालिकेच्या महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. आता पालिका आयुक्त पी. वेलरासु याची अंमलबजावणी करतात का? याकडे लक्ष्य लागले आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परीवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी पदभार घेतल्यानंतर उत्पन्न वाढणे आणि बेशिस्त अधिकारी व कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता दिवसेंदिवस केडीएमटी डबघाईला जात असल्याने महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना शासन दरबारी पाठवण्याचा प्रस्ताव परिवहन समितीने शुक्रवार 10 नोव्हेंबरला बहुमताने मंजूर करत महासभेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर होतो की नाही यावर पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होती. 

दरम्यान आज मंगळवारी महानगरपालिकेच्या महासभेत प्रस्ताव येताच सर्व पक्षीय नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणे शासनाकडून आलेल्या अधिकारी वर्गालाही परत पाठविण्याची मागणी केली. यावेळी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी केडीएमटी  प्रभारी कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत हा पालिकेचे काम की अन्य कुणाचे काम करतो? आणि ट्रेनिंगसाठी येथे कर्मचारी येतात व निघून जातात, मग केडीएमटी पुढे कशी जाईल असे सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केलेत. टेकाळे सोबत केडीएमटी प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम आणि प्रभारी आगार प्रमुख संदीप भोसले यांनाही बडतर्फ करण्याची उपसूचना स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी मांडली. 

यावेळी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी न केल्यास आयुक्तावर अविश्वास ठराव आणू असा इशारा दिला. तर त्याला अनुमोदन विरोधी पक्ष नेता मंदार हळबे यांनी दिले.

सभागृहातील विरोध बघता पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी यावर अभ्यास केला नसल्याचे सांगत देविदास टेकाळे यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी सभागृहाला विनंती केली. त्यानंतर केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सभागृहात येऊन आपल्या कालावधीत उपन्न वाढ झाल्याचे कथन करत माहिती देण्यास सुरुवात करताच शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी हरकत घेतली. अखेर सभागृहातील सर्व पक्षीय नगरसेवकांचा विरोध बघता केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना शासन दरबारी पाठवा या मागणीसह केडीएमटी प्रभारी आगारप्रमुख संदीप भोसले आणि प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम यांना बडतर्फ करण्याच्या उपसुचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी मोरेश्वर भोईर यांनी प्रशासनाला दिले आहेत. पालिका आयुक्त पी. वेलरासु काय भूमिका घेतात, याकडे लक्ष्य लागले आहे.  

राहुल दामले, सभागृह नेता राजेश मोरे, विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, रमेश जाधव, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, नितीन पाटील, सुधीर बासरे, श्रेयस समेळ, प्रकाश पेणकर, प्रकाश भोईर, विश्वनाथ राणे, पवन भोसले, मल्लेश शेट्टी आदी नगरसेवकांनी सभागृहात टेकाळे यांच्या शासन दरबारी पाठविण्याचा प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला होता. 

महापौर राजेंद्र देवळेकर ऐवजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद कल्याण न्यायालयाने रद्द केल्याने आज महापौर देवळेकर महापालिकेत फिरकले नाही. त्यामुळे सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी कामकाज हाती घेतले होते.

 

Web Title: Marathi News_Kalyan_KDMT General Manager Devidas Takale _apprised the proposal for sending the court