एमआयडीसी प्रशासनाची तात्काळ धाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

वाहिनी फुटल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाला मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे कारखानदार आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

रसायनी - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कराडे खुर्द गावाच्या हद्दीत टाकाऊ प्रदूषित सांडपाणी वाहुन नेणारी वाहिनी नुकतीच दोन ठिकाणी फुटली होती. पावणेतीन वर्षापुर्वी याच ठिकाणी वाहिनी फुटली होती. त्यावेळी प्रदूषित सांडपाणी शेतात घुसले होते. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते. आता ही गळती झालेले प्रदूषित सांडपाणी शेतात घुसले तर कडधान्यांचे पिक करपून जातील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली होती. दरम्यान वाहिनी फुटल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाला मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे कारखानदार आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी शुध्दीकरण केंद्रात (सीईटीपी) प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. हे प्रक्रिया केलेले सांडपाणी आपटा गावाच्या हद्दीत सुमारे साडेआठ किलोमीटर अंतरावर पाताळगंगा नदीतून समुद्राच्या मुखात सोडले जात आहे. दरम्यान सांडपाण्याची वाहिनी कराडे खुर्द गावाच्या हद्दीत फुटली होती. गावातील जागृत नागरिकांनी वाहिनी फुटल्याची एमआयडीसीला माहिती दिली. एमआयडीसीने तातडीने चोवीस तासात दुरुस्तीचे काम केले आणि सांडपाण्याची गळती थांबवली आहे. 

19 फेब्रुवारी 2015 ला येथे सांडपाण्याची वाहिनी फुटली होती. त्यावेळी शेतात प्रदूषित सांडपाणी घुसल्याने भाजीपाल्यांचे मळे आणि कडधान्यांचे पिक करपून गेले होते. आता वाहिनी फुटल्यानंतर एमआयडीसीने तातडीने काम केले चांगले झाले, असे परिसरातील माधव पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: Marathi News_Rasayani_Thane_MIDC_The repair work is done immediately.