उर्दू शाळांमध्ये मराठीचे शिक्षक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वाडा - वाडा तालुक्यात कुडूस, उसरकॅम्प, खानिवली या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या तीनही शाळांच्या शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येईपर्यंत त्यांना कार्यमुक्त करायला नको होते किंवा उर्दू शिक्षकांचीच पर्यायी व्यवस्था व्हायला हवी होती. पंरतु तसे न करता तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक उर्दू शाळांवर केली आहे.

वाडा - वाडा तालुक्यात कुडूस, उसरकॅम्प, खानिवली या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या तीनही शाळांच्या शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येईपर्यंत त्यांना कार्यमुक्त करायला नको होते किंवा उर्दू शिक्षकांचीच पर्यायी व्यवस्था व्हायला हवी होती. पंरतु तसे न करता तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक उर्दू शाळांवर केली आहे. हा निर्णय घेताना मराठीचे शिक्षक उर्दू शाळेतील मुलांना काय शिकवणार हा साधा विचार होऊ नये याबद्दल मुस्लिम पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ही माहिती घेत असतानाच शिक्षण विभागाच्या व्यवस्थापनाचा एकूणच उडालेला बोजवारा समोर आला. तालुक्यात उंबरपाडा, गाळे, पाहुणीपाडा, कोळकेवाडी, तीळमाळ या शाळांत विद्यार्थी पटसंख्या 5 ते 6 एवढीच असताना त्यांच्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमधील एकेका शिक्षकाची उर्दू शाळेवर तात्पुरती नेमणूक योग्य ठरली असती पंरतु तसे न करता कुडूस, वडवली, आब्जे या मोठा पट असलेल्या शाळांतील एकेक शिक्षक उर्दू शाळेत नियुक्त केले आहेत. विशेषतः वडवली शाळेची 1 ली ते 5 वीची पटसंख्या 40 असताना एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळतो त्यांच्या कार्यक्षमतेचा मुलांचा विचार केलेला नाही तर गातेस खुर्द या 29 पटसंख्या असलेल्या शाळेच्या शिक्षिका रजेवर जाताच तीथे पर्यायी शिक्षक लगेच दिला गेला म्हणजे मजीनुसार सोय आणि गैरसोय हा व्यवस्थापनाचा मनमानी कारभार दिसून येतो. 

उर्दू शाळांतील मोठा पट असलेल्या शाळांतील मुलांची गैरसोय विचारात घेताना 5 ते 6 एवढा कमी पट असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत ठेवण्याच्या धोरणाचा अंमलबजावणीच्या पातळीवर विचार होण्याची गरज आहे. 

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधा देण्याच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम सुरू होत असल्याच्या संकल्पना जाहीर होत आहेत. परंतु एकेकाळी जीवन शिक्षण विद्यामंदिर असे नाव असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पट आणि शिक्षक ही विसंगती दुर होणे जरूरीचे आहे अन्यथा ग्रामीण भागातील मुलांच्या जीवन शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. 

विकल्पाचे शिक्षक दुस-या जिल्ह्यात गेल्याने उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. येत्या एक दोन महिन्यात ही पदे भरण्यात येतील. ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी मानधनावर शिक्षक नेमले आहेत. 
राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पालघर 

उर्दू शिक्षकांबाबत जिल्हा पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच उर्दू शिक्षक देण्यात येतील. 
कृष्णा जाधव, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा 

Web Title: Marathi teachers in Urdu schools