धक्कादायक! मुलीची हत्या करत मराठी अभिनेत्रीने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मुलीची हत्या करत एका मराठी अभिनेत्रीने स्वत:च आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रज्ञा पारकर असून आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी तिने लिहिली आहे.

मुंबई : मुलीची हत्या करत एका मराठी अभिनेत्रीने स्वत:च आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रज्ञा पारकर असून आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी तिने लिहिली आहे.

अभिनेत्री प्रज्ञा पारकर आपली मुलगी श्रृतीसह ठाण्यामधील कळवा येथे राहत होती. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञाकडे काही काम नव्हते तसेच तिच्या पतीच्या व्यवसायात हवी तशी प्रगती होत नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती, असे तिने लिहेलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

ही घटना आज (ता. 11) रविवारी सकाळी 09 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रज्ञाने सकाळी आपला नवरा जिमला गेल्यानंतर प्रथम मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवले. जेव्हा प्रज्ञाचा नवरा जिमवरुन परत आला तेव्हा त्याने घराचा दरवाजा आतून लॉक असल्याचे पाहिले. बराच वेळ वाट पाहूनही कोणी दार उघडत नसल्याने त्यांनी दारवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना धक्काच बसला, कारण घरात त्यांना प्रज्ञा आणि श्रृती मृतावस्थेत आढळून आल्या.

आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून प्रज्ञा यांनी हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रज्ञाने काही मराठी मालिकांमध्ये तसेच एका मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Tv Actress Pradnya Parkar Commits Suicide Kills Daughter