मार्जिनल स्पेसचा बाजार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

बेलापूर - मार्जिनल स्पेस खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना भाड्याने देऊन संबंधित दुकानदार वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. या विक्रेत्यांवर पालिका आणि सिडको कारवाई करत असताना त्यांचे सामान दुकानात ठेऊन त्यांना पाठीशी घातले जाते. मार्जिनल स्पेसचा अशाप्रकारे गैरवापर वाढल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बेलापूर - मार्जिनल स्पेस खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना भाड्याने देऊन संबंधित दुकानदार वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. या विक्रेत्यांवर पालिका आणि सिडको कारवाई करत असताना त्यांचे सामान दुकानात ठेऊन त्यांना पाठीशी घातले जाते. मार्जिनल स्पेसचा अशाप्रकारे गैरवापर वाढल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातील इमारतींसमोर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. या दुकानासमोर नागरिक व पादचाऱ्यांसाठी मोकळी जागा सोडली आहे; परंतु अनेक दुकानदारांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई करून मार्जिनल स्पेस अतिक्रमण मुक्त केली होती; मात्र त्यांची बदली झाल्यावर काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले आहे. काही दुकानदारांनी वडापाव, पाव भाजी, ज्यूस सेंटर, दाबेली, इडली डोसा, पाणीपुरी यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना मार्जिनल स्पेस भाड्याने दिली आहे. त्यातून त्यांना दरमहा हजारो रुपये मिळतात. परंतु यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

सिडकोच्या जागेचाही गैरवापर
वाशीतील रेल्वेस्थानकासमोरील भूखंडावर सिडकोने दुकाने बांधली आहेत. या दुकानांमध्ये हॉटेल थाटण्यात आली असून मार्जिनल स्पेसमध्ये टेबल-खुर्च्या मांडण्यात येत आहेत. काही ठिकाणी वातानुकूलिन हॉटेल आणि मार्जिनल स्पेसमध्ये साधे हॉटेल थाटले आहे. हॉटेलच्या बाहेर पानटपरी, वडापाव, समोसा, चहाचा स्टॉल, इडली-डोसा अशा खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी मार्जिनल स्पेस भाड्याने दिली आहे. यातून वर्षाला लाखो रुपये ते कमावत आहेत. पालिका आणि सिडकोच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

यंदा शहरातील कोणत्याही व्यावसायिकांना व दुकानदारांना दुकानासमोरील जागेत शेडला परवानगी दिलेली नाही; मात्र तरीही कोणी शेड उभारून जागेचा व्यावसायिक वापर करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ. एन. रामास्वामी, पालिका आयुक्त

मार्जिनल स्पेस भाड्याने दिली जात असल्याने ग्राहक व पादचारी यांची गैरसोय होते. काही ठिकाणी धंद्यात टक्केवारी ठरवून कमिशन घेतले जाते. अनेक दुकानदार मार्जिनल स्पेसचा वापर दुकानातील साहित्य व जाहिरातींसाठी करत आहेत. याकडे सिडको आणि पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. 
- विजय पाटील, नेरूळ

Web Title: Market of marginal space