परदेशी तरुणींचे साडी अन्‌ पुणेरी फेटे घालून वरातीत ठुमके

निसार अली
बुधवार, 2 जानेवारी 2019

मालाड - परदेशी पाहुणे फारच दिलखुलास स्वभावाचे मानले जातात. नव-नवे मित्र जोडण्याची त्यांची हौस वाखाणण्याजोगी. भारतीय संस्कृती अन्‌ परंपरांबद्दलही त्यांना मोठे कुतूहल आहे. त्याच कुतूहलापोटी जर्मनीच्या दोन तरुणींनी संधी मिळताच थेट पुणे गाठले अन्‌ मुंबईतील मैत्रिणीच्या लग्नात चक्क मराठी गाण्यांवर ठेका धरला. तोही साडी अन्‌ पुणेही फेटा घालून.  

मालाड - परदेशी पाहुणे फारच दिलखुलास स्वभावाचे मानले जातात. नव-नवे मित्र जोडण्याची त्यांची हौस वाखाणण्याजोगी. भारतीय संस्कृती अन्‌ परंपरांबद्दलही त्यांना मोठे कुतूहल आहे. त्याच कुतूहलापोटी जर्मनीच्या दोन तरुणींनी संधी मिळताच थेट पुणे गाठले अन्‌ मुंबईतील मैत्रिणीच्या लग्नात चक्क मराठी गाण्यांवर ठेका धरला. तोही साडी अन्‌ पुणेही फेटा घालून.  

भायखळ्यात राहणारी वकील मेघा गावडे हिची २०१३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनमध्ये बॅरिस्टर ऑफ लॉच्या शिक्षणाच्या वेळी जर्मनीतील जेनिफर पे आणि साराह ली यांच्याशी मैत्री झाली. पाच वर्षांच्या मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की, मेघाच्या लग्नासाठी दोघी सातासमुद्रापार दाखल झाल्या. लग्नात जाऊन वधू-वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या इतपतच त्यांचा उत्साह सीमित नव्हता, तर त्यांनी मराठी गाण्यांवर पाश्‍चिमात्य शैलीत नृत्य करत धमाल केली. मेघाच्या लग्नात दोघी भाव खाऊन गेल्या. परदेशी पाहुण्यांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातील वऱ्हाडी मंडळींनी तर त्यांच्याबरोबर सेल्फी आणि छायाचित्रेही काढली.

पुणे जिल्ह्यातील मंचर गावात नुकताच मेघा गावडे आणि अमोल पडवळ यांचा विवाह थाटामाटात पार पडला. जेनिफर आणि सराह पुणेरी फेटा व साडी अशा पेहरावात आल्या होत्या. धनश्री हांडे आणि धनश्री पोरे यांनी त्यांना साडी नेसवली. लग्नाच्या वरातीत सगळ्यांना नाचताना पाहून दोघीही त्यात सहभागी झाल्या. मराठी गाण्यांवर पाश्‍चात्य शैलीत दिलखुलास नृत्य करत सर्वांचे मनोरंजन केले. वधू-वरांसाठी त्यांनी खास जर्मनीवरून भेटवस्तू आणली होती. ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याचे विशेष कौतुक केले.

मंगलाष्टके, वधू-वरांवर टाकण्यात येणारी अक्षता, रुखवत आणि पाहुण्यांचे मानपान पाहून त्या भारावून गेल्या. सर्व लग्नविधी दोघी कुतूहलाने पाहत होत्या. त्यांची माहितीही त्यांनी आवर्जून करून घेतली अन्‌ भारतीय संस्कृतीचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी मुंबईसह जयपूर आणि ताजमहालला भेट दिली.

भारतीय संस्कृती खूपच छान आहे. भारतीयांच्या सर्वच प्रथा विज्ञानाला धरून आहेत. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा प्रभाव अधिकच जाणवतो. आम्ही भारतात प्रथमच आलो. विवाहसोहळ्यातील सहभागाने आम्ही फारच हरखून गेलो.
- जेनिफर पे आणि साराह ली

Web Title: Marriage Foreign Girl