हुतात्मा राणे यांना साश्रू नयनांनी निरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

"धीरल सागर' इमारतीबाहेर हुतात्मा राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच रांग लागली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लष्कराच्या सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रा मार्गस्थ होत असताना चौकाचौकांत नागरिक सहभागी होत होते. शीतल नगर परिसरात पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मीरा रोड स्थानक परिसरापर्यंतचा संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. अंत्ययात्रा मार्गस्थ होत असलेले दोन्ही बाजूंकडील रस्ते वाहनांसाठी बंद होते. दुकानदार दुकाने बंद करून अंत्ययात्रेत सहभागी झाले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे राणे कुटुंब 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत आहे. कौस्तुभ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गढवाल रायफल्स युनिटचे दक्षिण-पश्‍चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चेरीश माथसन यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवीन बजाज, ठाणे ग्रामीण पोलिस आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.

बहिणींकडून शेवटची राखी
मेजर कौस्तुभ राणे यांना एक लहान सख्खी बहीण व चार चुलत बहिणी आहेत. ते लष्करात गेल्यापासून बहिणी टपालाने राखी पाठवत. काही दिवसांवर आलेल्या राखीपौर्णिमेसाठी आपल्या लाडक्‍या भावाला आता राखी पाठविता येणार नसल्यामुळे त्यांनी कौस्तुभला आवडत असलेले कॅडबरी चॉकलेट व राखीची भेट देत अखेरचा निरोप दिला. ते पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले.

Web Title: Martyr Kaustubh Rane Funeral