माहूलवासीयांचे हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर माहुलवासीयांनी न्यायासाठी साकडे घातले आहे.
  • पालिकेने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आम्हाला हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर माहुलवासीयांनी न्यायासाठी साकडे घातले आहे. पालिकेने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आम्हाला हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आपल्या मागण्यांसाठी माहुलवासीयांनी दादरमधील शिवसेना भवनला सदिच्छा भेट दिली. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. माहुलवासीय प्रदूषणामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त झाले आहेत. अनेक रहिवाशांचा यात मृत्यू झाला आहे. यामुळे या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

याप्रकरणी न्यायालयानेही माहुलवासीयांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते; मात्र पालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. माहुल परिसरात १७ हजार २०० घरे असून ४० हजारांवर रहिवासी वास्तव्यास आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून इथले रहिवासी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत; मात्र त्याची फारशी दखल सरकारने किंवा पालिकेने घेतलेली नाही. पालिकेने तर आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने ते आपल्या मागण्यांची दखल घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा सर्व माहुल प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mass movement of mahulkars for home