
Mumbai Fire : कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग; 25 हून अधिक घरं जळून खाक
मुंबईचा धारावी शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगरचा झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शाहूनगर परिसरातील 25 हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. अजुनही आग धुमसताना दिसत आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
मुंबईच्या शाहूनगर परिसरात असणाऱ्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे 4 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत. अग्निशमक दलाच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. परिसरात सध्या फायर कुलिंगचं काम सुरू आहे.
ही आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 20 ते 25 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.