साहित्य संमेलनाच्या खर्चाला कात्री 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लोकसहभागातून संमेलनासाठी फारसा निधी जमा न झाल्याने आयोजक चिंतेत... 

डोंबिवली - डोंबिवलीतील साहित्य संमेलनाला अवघे नऊ दिवस राहिले आहेत. शहरात होणाऱ्या या संमेलनासाठी आर्थिक मदतीसाठी आयोजकांनी आवाहन करूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी संमेलनासाठी होणाऱ्या खर्चांवर अनेक मर्यादा येणार आहेत.

संमेलनस्थळाची घोषणा झाल्यानंतर हे संमेलन भवदिव्य करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला होता; पण त्यानंतर नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे त्यावर पाणी पडले. उलट या संमेलनाच्या आर्थिक मदतीसाठी आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले होते. त्यातून आतापर्यंत एक कोटी 58 लाख रुपयेच जमा झाले. संमेलनासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च असल्याने त्या तुलनेत जमा रक्कम अपुरीच असल्याने उर्वरित रक्कम जमा कशी करायची, असा प्रश्‍न आयोजकांपुढे ठाकला आहे. 

संमेलनस्थळ जाहीर झाल्यानंतर आयोजकांनी मोठ्या उत्साहाने संमेलनाची तयारी सुरू केली. पण केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका त्यांना बसला. त्यातून सावरत छोटे-मोठे उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जेमतेम एक कोटी 58 लाख आयोजकांच्या पदरात पडले आहेत. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे निधीसंकलनाच्या कामात आचारसंहितेचा अडसर आला. या आचारसंहितेमुळे इच्छुक आणि दानशूर राजकीय मंडळीनाही हात आखडता घ्यावा लागला आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेतील सर्व नगरसेवकांचे स्थानिक विकास निधी संमेलनासाठी मिळावेत यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे विनंती केल्याचे संमेलनाचे प्रसिद्धिप्रमुख चंद्रकांत माने यांनी सांगितले. दरम्यान, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार फंडातून 87 लाख रुपये जाहीर केले आहेत. त्यातील 60 लाख रुपये आयोजकांना मिळाले असून त्यातील 18 लाख रुपये येणे बाकी आहे. 

मनसेचा पुढाकार 
प्रीमियर कॉलनी मैदानावर सुरू असलेल्या कामगारनेते रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट सामन्याचा समारोप समारंभ बुधवारी (ता. 25) होणार आहे. या वेळी 11 लाखाचा धनादेश आयोजकांकडे देणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी दिली. 

जेवणावळीचा खर्च भाजीविक्रेत्यांचा 
साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्यांच्या जेवणावळीच्या खर्चाचा भार कल्याणचे काही व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांनी घेतला आहे. भोजनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य ही मंडळी देणार आहेत. त्यामुळे आयोजकांचे 25 ते 30 लाख रुपये वाचणार आहेत. 

संमेलनाचे बजेट जरी कमी झाले असले, तरी लोकांना अपेक्षित असल्याप्रमाणे संमेलन होईल. या संमेलनात अनावश्‍यक खर्च टाळण्यात येईल. 
- गुलाब वझे, स्वागताध्यक्ष.

Web Title: Material meeting the expenses Scissors