पूरग्रस्तांच्या मदतीला माथाडी कामागारांचाही हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

वसई-विरार, नालासोपाऱ्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी टेम्पो 

नालासोपारा : महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील लाखो संसार वाहून झाले. उद्‌ध्वस्त झालेले हे संसार नव्याने उभारसाठी संपूर्ण राज्यातून अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रत्येक जण यात आपला वाटा उचलत असून वसई-विरार, नालासोपाऱ्यातील माथाडी कामगारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या तुटपुंज्या पैशांना एकीचे बळ देत माथाडी कामगारांनी संसारोपयोगी वस्तू खरेदी करून मंगळवारी (ता.13) टेम्पो भरून मदत पुरग्रस्तांना पाठवली आहे. आम्ही जास्त काही देऊ शकत नाहीत; पण पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात आपणही खारीचा वाटा उचलू, या हेतून मदतीसाठी पुढे आल्याच्या भावना स्थानिक कामगार विकास संघटना पालघरच्या सभासदांनी या वेळी व्यक्त केल्या. 

वसई-विरार, नालासोपारा परिसरातील 150 कामगारांनी 200 ते 300 रुपये पूरग्रस्तांसाठी काढून मदत उभारली आहे. कामगारांनी कांदे, बटाटे, औषधे, तांदूळ, गहू, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुढे, कोल्ड्रिंक्‍सच्या बाटल्या, चहा पावडर, पिठाच्या गोणी, मीठ, साबण अशा संसारोपयोगी वस्तूंचा टेम्पो पूरग्रस्तांना पाठवला. मदतीसाठी संघटनेतील मुकादम भरत शिंदे, पांडुरंग भोसले, अशोक सकपाळ, संजय व्हावले, मंगेश शेलार, धोंडिबा शिंदे, विजय भोसले यांनी पुढाकार घेतला. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मोठमोठ्या सामाजिक, औद्योगिक संस्था पुढे आल्या आहेत. आम्ही स्वतः दिवसाला 400 ते 500 रुपये कमावतो; पण आपत्तीमध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा संसार उद्‌ध्वस्त झाल्यावर तो उभारण्यासाठी सहन करावा लागणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे. त्याच उद्‌ध्वस्त संसारांना थोडा हातभार लावण्याच्या उद्देशाने मदत पाठवली आहे. 
- भरत शिंदे, मुकादम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadi workers help flood victims in Sangali, Kolhapur at Vasai