माथेरान लिदीपासून मुक्‍त

माथेरान : निसर्गऋण बायोगॅसमध्ये लिदीपासून गॅसनिर्मिती होत असताना त्याची माहिती घेताना नगराध्यक्षा.
माथेरान : निसर्गऋण बायोगॅसमध्ये लिदीपासून गॅसनिर्मिती होत असताना त्याची माहिती घेताना नगराध्यक्षा.

माथेरान : पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरवण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन आहे. त्या घोड्याची लिद सर्वत्र पडत असल्याने तिची बाधा पर्यावरणाला पोहोचत असते. त्यामुळे नगरपालिकेसमोर ही गंभीर समस्या होती. पण ती सोडवण्यात नगरपालिकेला यश आले आहे. या लिदीची प्रक्रिया होऊन त्यापासून गॅसनिर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे.

माथेरानमध्ये एकूण ४६२ प्रवासी वाहन घोडे आणि १८० मालवाहू घोडे आहेत. याच घोड्यांची लिद माथेरानमध्ये सर्वत्र पडत असते. नगरपालिकेने ती उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करूनही लिदची योग्य विल्हेवाट लागत नव्हती. ही लिद नगरपालिकेसमोर मोठी डोकेदुखी होती. त्याच वेळेस येथील कार्यतत्पर मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी या लिदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. लिदीच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कल्चरयुक्त फवारणी करून दुर्गंधीमुक्त शहर केले. 

मात्र, दररोज पडणाऱ्या लिदीमुळे शहर बकाल होत होते. त्याच वेळेस कोकरे यांनी लिदीपासून बायोगॅस हा प्रयोग अमलात येऊ शकतो का? याचा अभ्यास सुरू केला. हा प्रयोग यशस्वी होताच येथील निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात लिदीसाठी स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात आणली. माथेरानमधील सर्व विभाग, तबेले, घोडे उभे असणारे नाके येथून नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत लिद संकलन केले. त्यानंतर लिदीपासून बायोगॅसची उत्पत्ती करण्यात आली. या गॅसचा उपयोग माथेरानमधील महत्त्वांच्या रस्त्यावर वीजपुरवठा करण्यासाठी होत आहे.

अशी प्रक्रिया होते...
लिद संकलन केल्यानंतर ती पाण्याच्या टाकीत टाकली जाते. पाणी आणि लिद यांचे मिश्रण तयार करून यामधून गवत बाजूला केले जाते. लिदमिश्रित पाणी हे प्री डायजेस्टरमध्ये सोडले जाते. त्यावर मिश्रणाची प्रक्रिया होऊन मुख्य डायजेस्टरमध्ये सोडले जाते. त्यानंतर हे मिश्रण २४ दिवस ठेवून गॅस प्रक्रिया सुरू होते. गॅस हा मुख्य डायजेस्टरमधून डोममध्ये जातो आणि डोममधून हळूहळू तो बलूनमध्ये जमा होण्यास सुरुवात होते.

माथेरानमध्ये लिद ही समस्या खूप गहन होती. ६०० च्या आसपास घोडे असल्याने साहजिकच घोड्यांची विष्टा म्हणजे लिद ही जास्त प्रमाणात पडणार; पण तिची विल्हेवाट लावणे हे आमच्या समोर आव्हान होते. यासाठी लिदीपासून गॅस प्रक्रिया होते का? याचा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यानंतर स्टेनलेस स्टीलच प्री डायजेस्टरची १२ फूट उंच टाकी बनवून तिच्यापासून प्रक्रिया सुरू केली एका वेळेस दीड टन लिद या प्री डायजेस्टरमध्ये राहते. त्यामुळे माथेरान आता लिदीपासून मुक्त होणार आहे.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी

लिदीपासून गॅस बनवण्याची प्रक्रिया कोकरे यांनी सांगितली. ती योग्य असल्याने आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत लिदमुक्त माथेरान करण्याचे ठरवले. लिदीमध्ये उष्णता जास्त असल्यामुळे गॅसचे प्रमाण वाढणार आहे. रस्त्यावरील वीजपुरवठ्याव्यतिरिक्त येथील हॉटेलवाल्यांना हा गॅस पुरवठा करून नगरपालिकेला उत्पन्न मिळेल, यावर विचार चालू आहे.
- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com