माथेरानचे रान पोखरले 

अजय कदम
गुरुवार, 10 जानेवारी 2019

माथेरान - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे रान वाळवीने अक्षरश: पोखरले आहे. गेल्या 2003 पासून दर वर्षी सरासरी 42 वृक्षांना वाळवी लागते, तर गेल्या वर्षी हेच प्रमाण वाढून तब्बल 67 वृक्ष या संकटामुळे कोसळले. त्यामुळे तब्बल 295 हेक्‍टरवर पसरलेली ही बहुमोल घनदाट वृक्षराजी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एवढ्या गंभीर संकटानंतर वन विभागाने ही संपदा वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. 

माथेरान - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे रान वाळवीने अक्षरश: पोखरले आहे. गेल्या 2003 पासून दर वर्षी सरासरी 42 वृक्षांना वाळवी लागते, तर गेल्या वर्षी हेच प्रमाण वाढून तब्बल 67 वृक्ष या संकटामुळे कोसळले. त्यामुळे तब्बल 295 हेक्‍टरवर पसरलेली ही बहुमोल घनदाट वृक्षराजी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एवढ्या गंभीर संकटानंतर वन विभागाने ही संपदा वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. 

माथेरानचे वातावरण बाराही महिने आल्हाददायक असते. त्यामुळे मुंबई, पुणे-ठाण्यातील पर्यटक या ठिकाणला हमखास भेट देतात. शेकरू, भेकर, सांबर अशा प्राण्यांबरोबरच मोर आणि अन्य पक्ष्यांसाठीसुद्धा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. अनेक अभ्यासकांना वृक्षराजी आकर्षित करते. त्यांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. निसर्ग मित्र संस्थेने गेल्या 13 वर्षांमध्ये केलेल्या अभ्यासातून या ठिकाणच्या वृक्षांना मोठ्या प्रमाणात वाळवी लागली आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या वर्षी 67 झाडांना वाळवीची लागण झाली, तर दर वर्षी सरासरी 42 वृक्ष वाळवीमुळे कोसळतात, असे स्पष्ट झाले आहे. 

2003 मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाले. त्यानंतर या भागातील पडलेले वृक्ष, पालापाचोळा असेल त्याच ठिकाणी ठेवला पाहिजे. त्यामुळे वन विभागाचे सुकलेल्या झाडांसाठीचा डेपो बंद झाला. पर्यायाने वाळवीचा प्रभाव वाढत गेला. 

पक्ष्यांचे प्रमाण कमी 
पूर्वी माकडांना हॉटेलमधील शिळे अन्न मिळत होते. आता हे शिळे अन्न बायोगॅससाठी वापरण्यात येते. पर्यायाने माकडांना अन्न मिळत नसल्यामुळे ते पक्ष्यांची अंडी खातात. त्यामुळे येथील वृक्षराजीत विहार करणाऱ्या बुलबुल, चिमणी, घार, स्वर्गीय नर्तक, कुकुटकुंभा, रानकोंबडा, कुटरूक, घुबड, बगळा, कावळा असे नानाविध पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. 

आमची संस्था माथेरानच्या वनावर अभ्यास करत आहे. या वनात अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे माथेरानचे वन हे संजीवनी देणारे ठरेल; पण इथल्या जंगलात वाळवीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. 
- पवन गडवीर, अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था 

माथेरानची जमिनी आणि वनस्पतीवर 20 वर्षांपासून अभ्यास करत आहे. 15 वर्षांपासून या ठिकाणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी कमी झाले आहेत. त्यामुळे वाळवीचे प्रमाण आपसूकच वाढले आहे. याकडे वन विभागाने कृत्रिम उपाय न करता नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहे. सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची संख्या वाढल्यास वाळवीचे प्रमाण नियंत्रणात येऊ शकेल. 
- अशोक कदम, जीवशास्त्र अभ्यासक 

Web Title: Matheran land Falls