ठाण्याच्या सुभेदारावरच मातोश्रीचा विश्‍वास

राजेश मोरे
Friday, 1 November 2019

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा गटनेतेपदी निवड

ठाणे : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाला बसवणार या चर्चेला गुरुवारी विराम मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच अखेर मातोश्रीने विश्‍वास टाकून त्यांना पुन्हा एकदा गटनेतेपदी नेमले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गटनेतेपदासाठी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत नाव सादर केले. ठाण्यातील शिवसेना आक्रमक ठेवल्यानेच मातोश्रीने पुन्हा शिंदे यांच्यावर विश्‍वास ठेवल्याचे मानले जात आहे.

वागळे इस्टेटमधून साध्या शिवसैनिकापासून एकनाथ शिंदे यांची कारकीर्द सुरू झाली. आनंद दिघे यांनी त्यांना शाखाप्रमुख केल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक आक्रमक आंदोलनात ते पुढे असत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आदेश आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणारा शाखाप्रमुख म्हणून त्यांची अल्पावधीत ठाण्यात ओळख झाली होती.

त्यातूनच त्यांनी थेट बेळगाव सीमा आंदोलनात भाग घेऊन तुरुंगावास भोगला होता. लोकांसाठी लढताना तुरुंगाला कधीही घाबरायचे नाही, ही दिघे यांनी दिलेली शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली होती. त्यामुळेच विरोधी पक्ष म्हणून काम करताना कायम रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून शिंदे यांची ओळख झाली आहे.

१९९७ मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. त्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन दिघे यांनी थेट त्यांना महापालिकेत सभागृहनेता म्हणून बढती दिली. याच काळात त्यांनी स्वतःला ठाणे महापालिकेपुरते मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्या वेळी जोडलेली माणसे त्यामुळेच आजच्या घडीलाही त्यांच्यासोबत राहिली आहेत.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या शिंदे नावाच्या पट्टशिष्याने जिल्ह्यात शिवसेना केवळ टिकवली नाही, तर वाढवली. दिघे यांच्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेना एकसंध ठेवत अधिक मजबूत केली. दोन वर्षांपूर्वी प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या ठाणे महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची एकहाती सत्ता मिळवण्यात शिंदे यांना यश आले.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली आहे.

२००४ मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून ते विजयी झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी २००५ मध्ये त्यांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. ठाणे मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले; तर २०१४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर मातोश्रीने त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिली होती; मात्र थोड्याच काळात शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रिपदासह सार्वजनिक बांधकाम-रस्ते (एमएसआरडी) मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

तसेच नुकतेच जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रिपदही त्यांच्याकडे देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सर्व चर्चा बाजूला सारून एकनाथ शिंदे यांनाच मातोश्रीने संधी दिल्याने ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून आनंदोत्सव साजरा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matoshree believes again on Eknath Shinde