पाठिंब्याची शक्‍यता नाही - अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यासच कॉंग्रेस विचार करणार

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यासच कॉंग्रेस विचार करणार
मुंबई - राजधानी मुंबईवर सत्ता स्थापन करण्याच्या शिवसेना - भाजपमधील स्पर्धेचे पडसाद राज्याच्या सत्तेवरदेखील पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत शिवसेनेच्या महापौरपदाला पाठिंबा द्यावा का, यावर कॉंग्रेस नेत्यांचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र ही शक्‍यता गुरुवारी फेटाळून लावली आहे. मात्र शिवसेनेने राज्य सरकारमधील भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यास त्यानंतरच्या परिस्थितीनुसार विचार केला जाईल, असे सूचक विधानदेखील चव्हाण यांनी केले आहे. यामुळे मुंबई महापौरपदासोबतच राज्यातल्या सत्तेच्या समीकरणांच्या हालचालीदेखील तीव्र होत असल्याचे सूचित होत आहे.

टिळक भवन येथे आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. हानगरपालिकांमध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झालेला असला, तरी जिल्हा परिषदांमध्ये मात्र आघाडीने सत्ता स्थापन केली जाऊ शकते, यावर विचार करण्यात आला. त्यासोबतच शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे कोणते परिणाम होतात याबाबतचा अंदाज घेण्यात आला. अशोक चव्हाण यांनी प्रत्येक नेत्यांशी व्यक्‍तिगत चर्चा केल्याने अधिक तपशील कळलेला नाही. मात्र राज्यात शिवसेनेने टोकाची भूमिका घेतल्यास कॉंग्रेसने कोणती भूमिका घ्यावी याबाबत मते जाणून घेतल्याचे समजते.

मुंबईत शिवसेनेला महापौरपदासाठी कॉंग्रेस पाठिंबा देण्याची शक्‍यता नाही. मात्र शिवसेना अद्यापही भाजपसोबत सत्तेत असून, जोपर्यंत शिवसेना ठाम भूमिका घेत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस काहीही निर्णय घेऊ शकत नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. बैठकीला माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अगोदरच शिवसेनेने सत्ता सोडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस मुदतपूर्व निवडणुकीला सामोरी जाण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Web Title: may not support shivsena