महापौर दालनात एसीतून गळती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - महापौरांच्या दालनात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना वातानुकूलित यंत्रातून (एसी) पाणी वाहू लागल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 6) घडला. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातील एसीतूनही पाणी पडत होते, तर आयुक्तांच्या दालनातील कपाट अचानक पडले होते. त्यामुळे तब्बल 100 कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या महापालिका मुख्यालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या कामावर पाणी फेरले गेले आहे. 

पालिका मुख्यालयाच्या इमारतीला हेरिटेज लूक देण्यात येत आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. महापौर, आयुक्तांपासून सर्वच समित्यांच्या अध्यक्षांनी या इमारतीतून कामकाज सुरू केले आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच नूतनीकरणाच्या खर्चावर पाणी पडायला सुरुवात झाली आहे. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात गुरुवारी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना अचानक एसीतून पाणी वाहू लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. महापौर संतापल्यावर पालिकेच्या मेन्टेनन्स विभागाचे कर्मचारी धावत-पळत त्यांच्या दालनात पोहचले. त्यांनी तात्पुरत्या दुरुस्तीचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. 

असाच प्रकार महापौर निवडणुकीवेळी घडला होता. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातील एसीतून अचानक पाण्याच्या धारा लागल्या. काही दिवसांपूर्वी आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनातील कपाट पडले होते. या सर्व प्रकारांमुळे इमारत नूतनीकरणाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

बादल्यांमध्ये भरले पाणी! 
एसीतून पडणारे पाणी थांबवणे अवघड असल्याने महापौर दालन जलमय झाले होते. यावर उपाय म्हणून पाणी पडत असल्याच्या ठिकाणी बादल्या लावण्यात आल्या. या बादल्यांमध्ये पाण्याच्या आवाजामुळे महापौरांसह अधिकाऱ्यांचेही बैठकीतून लक्ष विचलित होत होते. स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात असाच तात्पुरता उपाय करण्यात आला होता. 

वातानुकूलित यंत्रातून गळणाऱ्या पाण्याबाबत पुन्हा असाच प्रकार घडणार असेल, तर नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा फायदा काय? 
- विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापौर. 

Web Title: The Mayor Gallery