
मुंबई महापालिकेचा कोणताही कार्यक्रम हा स्थानिक नगरसेवक अथवा महापौरांच्या अध्यक्षतेखाली होतो; मात्र सोमवारी (ता. 11) सागरी किनारा मार्गामधील भुयारी मार्गाच्या कामाला सुरवात करताना झालेल्या कार्यक्रमाचे पालिकेतील लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नव्हते
मुंबई : मुंबई महापालिकेचा कोणताही कार्यक्रम हा स्थानिक नगरसेवक अथवा महापौरांच्या अध्यक्षतेखाली होतो; मात्र सोमवारी (ता. 11) सागरी किनारा मार्गामधील भुयारी मार्गाच्या कामाला सुरवात करताना झालेल्या कार्यक्रमाचे पालिकेतील लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नव्हते. त्यावरून आज स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सागरी किनारी मार्गातील प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या बोगद्याच्या कामाची सुरुवात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेतील एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे त्यांना या कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली नव्हती. पालिकेच्या नियमाप्रमाणे अशा कार्यक्रमांसाठी महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष सर्वपक्षीय गटनेते यांना विशेष निमंत्रण दिले जाते; मात्र या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. रवी राजा यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर टीका केली आहे. पालिका प्रशासन कोणत्याही निर्णयात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही. किमान पालिकेतील लोकप्रतिनिधींना माहिती देणे अपेक्षित असताना प्रशासनाने तेही केले नाही. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
...म्हणून आयुक्त जुमानत नाही
पालिकेचे आयुक्त नगरसेवकांना जुमानत नाही, अशी तक्रार सर्वपक्षीय गटनेत्यांकडून केली जात आहे. भुयारी मार्गाच्या कार्यक्रमाला आयुक्तांसोबत मुख्यमंत्री होते. त्यामुळे आयुक्त पालिकेतील लोकप्रतिनिधींना का जुमानत नाही, हे स्पष्ट होते, असा चिमटा भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी काढला.
The mayor is not invited to the costal road event Criticism of BMC gov
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )