वृक्षतोडीला महापौरांचाही विरोध

File Photo
File Photo

ठाणे : परवानगी असल्याचा दावा करून मेट्रोच्या ठेकेदाराकडून रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करण्यात आली. या प्रकरणाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीही आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याची कारवाई करणाऱ्या ठेकेदार आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाला दिले आहेत.

मेट्रोच्या वतीने रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्याला मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला होता. तसेच बुधवारी रात्री हा प्रकार होत असताना तेथे प्रत्यक्ष जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे काम थांबविले होते. त्यानंतर ही झाडे तोडण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी महापौरांची आज भेट घेतली.

त्या वेळी महापौरांनीदेखील अशा प्रकारे परस्पर रात्रीच्या वेळेत झाडे तोडण्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. तसेच उच्च न्यायालयात हा विषय असताना हा प्रकार घडल्याने याप्रकरणी वृक्ष प्राधिकरण विभागाने गुन्हे दाखल करावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

शिवसेना ठाण्यातही आक्रमक
शिवसेनेचा विरोध असलेल्या आरे कॉलनीत अशाच प्रकारे मेट्रो प्रशासनाच्या वतीने एका रात्रीत झाडांची कत्तल करण्यात आली होती. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्वरित त्या रात्री या झाडांची कत्तल करण्यात आली होती. शिवसेनेची सत्ता आल्यानतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वृक्षतोडीला अद्याप आपला विरोध असल्याची भूमिका कायम ठेवून थेट येथील मेट्रोच्या कामालाच स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही रात्रीच्या वेळेत झाडे तोडण्याच्या प्रकारावरून शिवसेना आक्रमक भूमिकेत गेली आहे.

वृक्षप्राधिकरणाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवरील स्थगिती उठल्यानंतर तीन हात नाका येथील काही झाडांच्या केवळ फांद्या तोडण्याचा दावा एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आला होता; मात्र शहराच्या पर्यावरणासाठी ही झाडे तोडू देणार नसल्याची भूमिका मनसेसह म्यूज संस्थेने घेतली आहे. त्यानंतर आज ठाणे मतदाता जागरण अभियानाचे कार्यकर्ते, याचिकाकर्ते रोहित जोशी आणि काही सामाजिक संस्थांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने झाडे तोडली जात असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एवढी मोठी घटना घडल्यानंतरही वृक्षप्राधिकरण विभागाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा संताप महापौरांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com