एमबीए तरुणाला खंडणीप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

समाजमाध्यमांवर तरुणीसोबत अश्‍लील चॅटिंग करणे, तिला स्वत:चे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र पाठवणे पवईतील तरुणाला चांगलेच महागात पडले. या छायाचित्राचा धाक दाखवून या तरुणाकडे आठ लाखांची खंडणी मागण्यात आली.

मुंबई - समाजमाध्यमांवर तरुणीसोबत अश्‍लील चॅटिंग करणे, तिला स्वत:चे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र पाठवणे पवईतील तरुणाला चांगलेच महागात पडले. या छायाचित्राचा धाक दाखवून या तरुणाकडे आठ लाखांची खंडणी मागण्यात आली. अखेर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या प्रकरणात त्याच्या मित्राचाच हात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याच्या उच्चशिक्षित मित्राला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. 

पवई परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या एका मित्राने काही दिवसांपूर्वी पार्टी दिली होती. त्या वेळी त्याची ओळख अहमद शमुअल हक (३२) या एमबीएचे शिक्षण घेतलेल्या तरुणाशी झाली. त्यावेळी या दोघांनी एकमेकांच्या मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली. काही दिवसांनी या तरुणाच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एका तरुणीचा संदेश आला. त्यानंतर या दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित संवाद होऊ लागला व कालांतराने चांगली मैत्रीही झाली. 

या तरुणाने भेटण्याची इच्छा व्यक्त केली; मात्र तरुणीने वारंवार नकार दिला. कालांतराने त्यांच्यात अश्‍लील गप्पागोष्टी सुरू झाल्या. त्यावेळी तरुणीने या तरुणाला त्याचे नग्नावस्थेतील छायाचित्र पाठवण्यास सांगितले. त्याने तशी छायाचित्रे तिला व्हॉट्‌सॲपवरून पाठवली. त्यानंतर या तरुणीने त्याच्याकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास ती छायाचित्रे समाजमाध्यमांवर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी तिने दिली. त्‍यानंतर संबंधित तरुणास पोलिसांनी अटक केली अाहे.

Web Title: MBA youth arrested for ransom

टॅग्स