वैद्यकीय प्रवेशाचा वाद कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई  - खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाच्या वादावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आयोजित बैठकीत तोडगा निघालेला नाही. परिणामी या महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेल्या २५० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत संधी दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून फीच्या माध्यमातून होणारी विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सर्व कोट्याच्या प्रवेशासाठी एकसमान फी आकारण्याची सूचना फी नियत्रंण समितीकडून करण्यात आली होती. राज्य सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीकडून देण्यात आलेल्या समान शुल्क आकारणी निर्णयाला खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला. 

जादा फी आकारणीचा मुद्दा कायम
पहिल्या फेरीतील २५० विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. यासंदर्भात बुधवारी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि खासगी वैद्यकीय कॉलेज प्रशासनाबरोबर विशेष बैठक गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात घेण्यात आली होती. दोन्ही बैठकींत खासगी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जादा फी आकारणीचा मुद्दा कायम राहिल्याने चर्चा फिस्कटली. खासगी महाविद्यालयांनी नाकारलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश फेरीमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Medical Entrance Dispute