पश्‍चिम रेल्वेवरही वैद्यकीय कक्ष अपघातग्रस्तांवर मोफत उपचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पश्‍चिम रेल्वेवर एकूण 37 स्थानके असून, त्यापैकी कमी वर्दळीची पाच स्थानके वगळता सर्व स्थानकांवर असे वैद्यकीय कक्ष उघडण्याची पश्‍चिम रेल्वेची योजना आहे. यापूर्वी पश्‍चिम रेल्वेवर सुरू असलेले 10 आपत्कालीन वैद्यकीय कक्ष होते; मात्र ते बंद करण्यात आले.

मुंबई : पश्‍चिम रेल्वेच्या 16 स्थानकांवर लवकरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू केले जाणार आहेत. रेल्वे अपघातातील जखमींवर त्यामुळे उपचार करणे सोपे होईल, असे मत रेल्वे प्रशासनातर्फे व्यक्त केले आहे. सध्या पश्‍चिम रेल्वेवर एकही वैद्यकीय कक्ष नाही. पश्‍चिम रेल्वेतर्फे नुकत्याच 32 स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष चालवण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी तीन संस्थांनी 16 स्थानकांवर हे कक्ष उघडण्यासाठी अर्ज केले होते. त्यांनी वेगवेगळ्या स्थानकांवर हे कक्ष उघडण्याची तयारी दाखवल्याने या सर्वांच्या निविदा मंजूर होतील, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

पश्‍चिम रेल्वेवर एकूण 37 स्थानके असून, त्यापैकी कमी वर्दळीची पाच स्थानके वगळता सर्व स्थानकांवर असे वैद्यकीय कक्ष उघडण्याची पश्‍चिम रेल्वेची योजना आहे. यापूर्वी पश्‍चिम रेल्वेवर सुरू असलेले 10 आपत्कालीन वैद्यकीय कक्ष होते; मात्र ते बंद करण्यात आले. नव्या वैद्यकीय कक्षांसाठी रेल्वे प्रशासन फलाटांवर जागा उपलब्ध करून देणार आहे. हे कक्ष स्वखर्चाने चालतील. रेल्वे अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार व आवश्‍यक ते तातडीचे उपचार विनामूल्य करण्याची जबाबदारी हे कक्ष चालवणाऱ्यांची असेल.

त्यासाठी येथे प्राणवायूचे सिलिंडर, अन्य जीवरक्षक औषधे व महत्त्वाची उपकरणे असतील. हे कक्ष चालविणाऱ्यांना तेथे आपापले स्वतंत्र वैद्यक व्यवसाय करण्याची मुभा राहील. त्यातूनच त्यांनी हे कक्ष चालवण्याचा खर्च भागवायचा आहे. 

लोकल प्रवासात वर्षाला मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. वर्दळीच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उघडावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार मध्य रेल्वेवर "वन रुपी क्‍लिनिक' सुरू झाली होती;

मात्र अद्यापही डहाणू, कर्जत व कसारापर्यंतच्या तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील 80 स्थानकांवर असे कक्ष नाहीत. त्यामुळे टप्प्या-टप्प्यांनी पश्‍चिम रेल्वेच्या इतरही स्थानकांवर ही वैद्यकीय केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 

Web Title: Medical Room on Western Railway Free Treatment on Accident Benefits