भाऊगर्दी मध्यमवयीनांची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

२२ वर्षांच्या तरुण उमेदवारासह ७६ वर्षांचे दोन ज्येष्ठही निवडणूक रिंगणात आहेत...

ठाणे - ठाणे महापालिकेच्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक उमेदवार ३१ ते ५० वयोगटातील अर्थात मध्यमवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी २५ प्रभागांतील उमेदवारांचे वय पालिकेने प्रसिद्ध केले आहे. यात मध्यमवयीन उमेदवारांची संख्या जास्त असून, त्याखालोखाल १८ ते ३० वयोगटातील तरुणांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ वर्षांच्या सर्वांत तरुण उमेदवारासह ७६ वर्षांचे दोन ज्येष्ठही निवडणूक रिंगणात आहेत.  

ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार उमेदवारांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष व अपक्षांची संख्या मिळून एक हजार २८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी २५ प्रभागांतील ७१७ उमेदवारांच्या वयाची नोंद पालिकेने जाहीर केली आहे. 

या माहितीनुसार ४६५ उमेदवार हे ३१ ते ५० वयोगटाचे, तर १३० उमेदवार १८ ते ३० वयोगटातील आहेत. ५१ ते ६० वयोगटातील १०५ उमेदवारांसह ६१ ते ७० वयोगटातील १५ जणांचे अर्जही दाखल झाले आहेत. ७६ वर्षांच्या दोन उमेदवारांनीही उमेदवारी दाखल केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. आठ प्रभागांतील उमेदवारांच्या वयाची माहिती पालिकेडून अद्याप तांत्रिक कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकलेली नाही; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा एकूण प्रभाव लक्षात घेता, मध्यमवयीन उमेदवारांचा टक्का अधिक असल्याचे दिसत आहे. 

तरुण व ज्येष्ठांचे प्रमाण यथातथाच
पालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखल झालेल्यांमध्ये तरुण व ज्येष्ठांना यथातथाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामधील कोणत्या वयोगटाकडे शहरातील मतदार आकृष्ट होत आहेत हे निकालावरून स्पष्ट होणार आहे.

३३ प्रभागांतून  एक हजार २८ अर्ज
ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधून एक हजार २८ अर्ज दाखल झाले आहे. त्यामध्ये पक्षाशी बंड करून बंडोबा ठरलेले अपक्ष, हौशी अपक्षांसह अन्य मंडळींचा भरणा आहे. महापालिकेच्या अ गटातून २१४, ब गटातून २०५, क गटातून २८० व ड गटातून ३२९ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती महापालिकेने जाहीर केली आहे.

Web Title: medium candidate rush in election