मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - मिनी विधानसभा निवडणुका आणि अर्थसंकल्पी अधिवेशन आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या प्रगतीचा फेरआढावा घेण्यासाठी उद्या (ता. 20) बैठक बोलावली आहे. भाजपचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून, कामाची गती वाढवणे हे बैठकीचे मुख्य सूत्र असेल. काही खात्यांची कामगिरी असमाधानकारक असून, काही सचिव योग्य सहकार्य करत नसल्याचीही मुख्यमंत्र्यांची भावना असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मिळालेल्या यशानंतर आता सरकारला घोषणा पूर्णत्वाला नेण्यात रस आहे. आगामी अडीच वर्षांत निवडणुकीला सामोरे जायचे असल्याची तयारी या बैठकीत सुरू होईल. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुविधांसंबंधीच्या खात्यांचा कारभार योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भावना आहे. या खात्यांची कामगिरी सुधारल्याशिवाय सरकारची प्रगती जनतेपर्यंत पोचणार नाही, असे त्यांना वाटते. या खात्यांमध्ये सुधारणा आणण्यासाठी सचिव स्तरावरचे अधिकारी बदलावेत काय, असा विचारही सुरू असल्याचे समजते.

मनोरा आमदार निवासाची वीज कापली
मनोरा आमदार निवासाने विजेचे देयक न भरल्याने आज काही काळासाठी त्यांचा पुरवठा कापला गेला. मनोरा तसेच अन्य आमदार निवास देयके भरत नाहीत, अशी तक्रार वारंवार करण्यात येत असते. आज यासंबंधीचा पाठपुरावा करताना मनोराचे देयक खूप थकले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वीजपुरवठादारांनी मनोराची वीज कापली. केवळ काही मिनिटांनी पुन्हा एकदा ही वीज सुरू करण्यात आली.

Web Title: meeting arrange by chief minister