कुर्ला-सायनमधील पादचारी पूल तोडणार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक चालेल.

मुंबई - मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक चालेल. मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक चालेल. या कालावधीत हार्बर, मध्य रेल्वेवरील लोकल, मेल/एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

ब्लॉकमध्ये हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द स्थानकांमध्ये दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. डाऊन हार्बरवर शनिवारी रात्री १०.५८ ते रात्री १२.४० आणि पहाटे ४.३२ ते ५.५६ पर्यंत, अप हार्बरवर शनिवारी रात्री ९.५९ ते रात्री १२.०३ आणि पहाटे ३.५१ ते ५.१५ वाहतूक बंद असेल. या कालावधीत पनवेल ते मानखुर्दमध्ये विशेष गाड्या चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाणे ते वाशी, नेरूळपर्यंत प्रवास करू शकतात.

मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम -
रविवारी पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन ए, मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत.

अमृतसर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी मुंबई फास्ट पॅसेंजर, कन्याकुमारी-सीएसएमटी जयंती-जनती एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मुंबई मेल, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जातील.

रविवारी सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस स. ९.०५ वा आणि सीएसएमटी-केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस स. १०.१० वाजता सुटणार आहे. याशिवाय रविवारी मुंबईत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: megablock for sion kurla bridge dismantle