नवी मुंबई महापालिकेत स्त्री-पुरुष भेदभाव!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

आरोग्य विभागात या पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांना आरोग्य सहायक पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा तब्बल साडेचार हजार रुपये कमी वेतनश्रेणी मिळत असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे.

मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्याच्या बदल्यातील रक्कम वाटपात भेदभाव होत असल्याची महिला कर्मचाऱ्यांची ओरड सुरू असतानाच पुन्हा आरोग्य विभागातील आरोग्य सहायक महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक असल्याची तक्रार समोर आली आहे. आरोग्य विभागात या पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांना आरोग्य सहायक पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा तब्बल साडेचार हजार रुपये कमी वेतनश्रेणी मिळत असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी तपास करण्याचे आदेश प्रशासन विभागाला दिले आहेत.   

महापालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य सहायक महिला या पदावर अनेक महिला कार्यरत आहेत. या महिलांची वेतनश्रेणी ठरवताना प्रशासनातर्फे पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा कमी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे पाचव्या वेतन आयोगापासून महिला कर्मचाऱ्यांना पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याची ओरड होत असल्याचे महिलांनी सांगितले. पाचव्या वेतन श्रेणीप्रमाणे आरोग्य सहायक महिला कर्मचाऱ्यांना ५ हजार ४०० वेतनश्रेणी निश्‍चित करण्यात आली होती. त्या वेळी पुरुषांची ९ हजार ४०० वेतनश्रेणी होती. 

सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर या वेतनश्रेणीत तेवढाच फरक ठेवून वाढ करण्यात आली; मात्र वेतन आयोग बदलला असला, तरी महिला कर्मचाऱ्यांच्या वाट्याला वेतनवाढ होऊनही पुरूष सहकाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. आरोग्य विभागातील महिलांप्रमाणे इतर विभागातील महिलांनाही असाच वेतनात फरक मिळत असेल, अशी शक्‍यताही काही महिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. 

आधीही झाला होता दुजाभाव
आरोग्य विभागातील क्षेत्रीय महिला कर्मचाऱ्यांना गमबुट व रेनकोट असे पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागातील पुरुषांना एक हजार ७९५ रुपये; तर चप्पल, छत्री असे साहित्य खरेदीसाठी महिलांना अवघे ६९९ रुपये दिले जात आहेत. पुरुषांना दिल्या जाणाऱ्या सुविधेप्रमाणे महिलांनाही भरपावसात फिरावे लागत असल्याने छत्रीऐवजी रेनकोट फायद्याचा असतो; मात्र प्रशासन रक्कम वाटप करताना भेदभाव होत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. 

भारतीय घटनेने स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार प्रदान केला आहे. महापालिकेत महिलांसोबत दुजाभाव केल्याचे दिसून येते. याआधी साहित्यवाटपात प्रशासनाकडूनच स्त्री-पुरुष भेदभाव केला. आता वेतन देण्यात प्रशासनातर्फे स्त्री व पुरुष असा फरक केला जात आहे. त्याविरोधात इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन आंदोलन करेल.
-रवींद्र सावंत, इंटक जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men and women discriminate in Navi Mumbai Municipal Corporation!