‘अबोली’त पुरुषांची घुसखोरी 

‘अबोली’त पुरुषांची घुसखोरी 

तुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला हरताळ फासला जात आहे. अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुषांच्या हातातच जास्त दिसत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने अबोली रिक्षासाठी परवाने मागणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत चालल्याची माहिती वाशी उपप्रादेशिक कार्यालयातून मिळाली. 

वाशी उपप्रादेशिक कार्यालयातून नवी मुंबई शहरात ७७ महिलांना अबोली रिक्षा चालवण्याचे परवाने देण्यात आले आहेत; मात्र सध्या बहुतांश अबोली रिक्षांवर पुरुष चालक दिसत आहेत. या रिक्षांकडे महिलांनीही पाठ फिरवल्यामुळे आरटीओ कार्यालयातील परवान्यांसाठी प्रतिसाद थंडावला आहे. महिन्यात फक्त एक ते दोन अर्ज आरटीओकडे येत आहेत. काही रिक्षाचालकांनी परमिट मिळत नसल्याने पत्नीच्या नावे अबोली रिक्षाचे परमिट घेतले आहे. त्यामुळे अशा रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी इतर रिक्षाचालकांनी केली आहे. 

अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुष चालक चालवत असल्यामुळे रिक्षातून प्रवास करताना महिला प्रवाशांना सुरक्षा मिळण्याचा मुख्य हेतूच विफल ठरला आहे. अबोली रिक्षा महिलांची असताना पुरुष कशी चालवतात? असा प्रश्‍न प्रवाशांनी विचारला असता त्यांना दादागिरी करून उत्तरे दिली जात आहेत. 

पुरुष चालकांची अरेरावी, दादागिरी, मनमानी होऊ नये म्हणून अबोली रिक्षाचे परवाने दिले होते; परंतु हा हेतूही फोल ठरत आहे. 

पैशांची मागणी 
काही वेळेस रिक्षा रांगेतून प्रवासी भाडे घेत असेल, तर आमच्या रिक्षाच्या पुढे पुरुष चालक रिक्षा उभी करतात. कट मारण्याचे प्रकार करतात. काही ठिकाणी थांब्यांवर युनियनचे सदस्य आहेत का? अशी विचारणा केली जाते आणि सदस्यत्वासाठी पैशांची मागणी केली जाते, अशी माहिती एका महिला रिक्षाचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. 

उत्साह मावळला 
सरकारने परमिट खुले केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक परमिट घेण्यासाठी अर्ज करत आहेत. रिक्षा परमिट खुले करण्याअगोदर २०१७ मध्ये १२ हजार ९१२ रिक्षा परमिट नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत चार हजार २६१ परमिट देण्यात आले. नवी मुंबईत आता १७ हजार १७३ रिक्षाचालकांना परमिट दिले आहे. 

महिला रिक्षाचालकांच्या परमिटसाठी सध्या अर्ज येत नसल्याचे दिसत आहे; मात्र त्यांचे कारण समजू शकले नाही. पुरुष रिक्षाचालकांकडून महिला रिक्षाचालकांना त्रास होत असल्यास त्यांनी आरटीओकडे पुरुष रिक्षाचालकांच्या नंबरसह तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय पोलिस ठाण्यातही तक्रार करावी. 
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com