'या' कारणामुळे त्याने न्यायाधीशांवर भिरकावली धातूची बासरी!

File Photo
File Photo

मुंबई : गोरेगाव येथील दिंडोशी सत्र न्यायालयात गुरुवारी (ता. २) एका महानगर दंडाधिकाऱ्यांवर वकिलाच्या वेषातील ६० वर्षीय व्यक्तीने धातूची बासरी भिरकावल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, वकिलांनाही काटेकोर तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, कृष्णजन्म असल्यामुळे आपण न्यायाधीशांना बासरी दिल्याचा दावा आरोपीने केला आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालय क्रमांक १० मध्ये महानगर दंडाधिकाऱ्यांचे काम नेहमीप्रमाणे सुरू झाले होते. या वेळी वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीने धातूची बासरी त्यांच्या दिशेने भिरकावली. या आकस्मिक घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली. पोलिस व अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. बासरी फेकणारा वकिलाच्या वेषात आल्यामुळे यापुढे वकिलांनी स्वतःची व आपल्याकडील साहित्याची सुरक्षा यंत्रणेद्वारे तपासणी करून घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे परिपत्रक प्रशासनाने जारी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाबाबत चौकशी सुरू केली आहे.

अतिरिक्त प्रधान न्या. एम. एस. शर्मा यांनी जारी केलेल्या या परिपत्रकाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे. काही न्यायालयांत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत दिंडोशीत महानगर दंडाधीकाऱ्यांवर बासरी फेकण्याची घटना घडल्यामुळे न्यायालयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आरोपीला अटक
कुरार पोलिसांनी ओमकारनाथ पांडे (६०) याला अटक केली. त्याने फेकलेली बासरी दिंडोशी न्यायालयातील महिला स्टेनोग्राफरच्या पाठीवर लागली. सुरक्षा रक्षक असलेला पांडे सध्या प्रकृती ठीक नसल्यामुळे बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हत्येच्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पांडेच्या विरोधात वॉरंट जारी केल्यानंतर वकिलासारखे कपडे घालून न्यायालयात आलेल्या पांडे याने हे कृत्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com