मुंबईत "मेट्रो-3'चे काम रात्री बंदच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

मुंबई - कुलाबा ते सीप्झ या भूमिगत मुंबई मेट्रो-3 चे काम ध्वनिप्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) अहवाल येईपर्यंत रात्रीच्या वेळी बंदच राहील, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने यासाठीची मनाई बुधवारी कायम ठेवली.

कफपरेड परिसरात सुरू असलेल्या या कामामुळे होत असलेल्या ध्वनिची मोजणी रात्रंदिवस करण्याचे आदेश न्या. अभय ओक आणि न्या. रियाज चागला यांच्या खंडपीठाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार याबाबत 2 ऑगस्टपर्यंत एमपीसीबीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत रात्री काम सुरू ठेवता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

मेट्रोच्या कामामुळे झोपमोड होत असल्याची तक्रार करणारी याचिका रहिवाशांनी केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान रात्री मुंबईत मेट्रोचे काम करता येणार नाही, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. त्यात दुरुस्ती करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने (एमएमआरसीएल) याचिका दाखल केली आहे. रात्री दीड वाजेपर्यंत काम सुरू असल्याचा दावा करणारी मोबाईलवरील ध्वनिचित्रफित तक्रारदारांनी सादर केली.

Web Title: metro 3 work close