ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा उल्हासनगरपर्यंत विस्तार?

metro
metro

मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. एमएमआरडीएने असा विस्तार होऊ शकेल का, याबाबत प्राथमिक सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान, उल्हासनगर येथे होणाऱ्या मेट्रो स्थानकाला "सिंधुनगर' असे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

ठाणे-भिवंडी-कल्याण या 24.9 किलोमीटरच्या मेट्रो-5 मार्गाच्या प्रकल्प अहवालात कोन परिसरात कारडेपो उभारण्याचा प्रस्ताव होता. नंतर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा देण्याचा निर्णय झाला; परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा दिल्यास शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्‍यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे हा निर्णय बारगळला. कोन परिसरातील 15 हेक्‍टर जागा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे मेट्रो कारशेडची जागा भिवंडीतील गोवे येथे हलवण्याचा निर्णय झाला आहे. 

मेट्रो कारडेपो, संलग्न वाणिज्यिक संकुल, मॉल आदी सोईसुविधा उभारून एमएमआरडीए हा खर्च वसूल करणार आहे; परंतु भविष्यात त्या जागेलाही विरोध होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने, पर्यायी जागेचा शोध एमएमआरडीएने सुरू केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कल्याणपर्यंत जाणारी मेट्रो पुढे उल्हासनगरपर्यंत नेल्यास तेथील एमएमआरडीएच्या मोकळ्या जागेवर कारडेपो उभारण्याचा प्रस्ताव आहे. 

उल्हासनगरमध्ये 4 एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते अभियानांतर्गत रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. उल्हासनगरपर्यंत मेट्रो नेल्यास उपनगरी रेल्वेवरील भार कमी होईल; तसेच ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल, असा अंदाज बांधून एमएमआरडीएने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासोबतच उल्हासनगर महापालिकेकडून "डीपी' आराखडाही मागवण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

साडेआठ हजार कोटींचा खर्च 
मेट्रो-5 प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास (डीपीआर) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मेसर्स डापोलोनिया आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी हा "डीपीआर' तयार केला असून, 17 स्थानके असलेल्या या मार्गासाठी सुमारे 8416 कोटी 51 लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com