मुंबईकरांना  मेट्रो भेट! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने  शहरी मतदारांना खूश करण्यासाठी मुंबई व उपनगरातील नवीन तीन मेट्रो मार्गांना मान्यता दिली.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने  शहरी मतदारांना खूश करण्यासाठी मुंबई व उपनगरातील नवीन तीन मेट्रो मार्गांना मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या आज (ता.२३) झालेल्या बैठकीत तब्बल १९,०८२ कोटी रुपयांच्या या नव्या मार्गांना मंजुरी देण्यात आली. मुंबई व उपनगरातील मेट्रो मार्ग १०, ११ आणि १२ ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) ९.२०९ किमी, वडाळा ते शिवाजीनगर १२.७७४ किमी आणि कल्याण ते तळोजा २०.७५ किमी या मार्गाचा समावेश आहे.   

गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग एकूण ९.२०९ किमी लांबीचा असलेल्या या मार्गापैकी ८.५२९ किमी उन्नत; तर ०.६८ किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये ४ उन्नत स्थानके असतील. 

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग- ११ ची एकूण लांबी १२.७७४ किमी आहे. त्यापैकी वडाळा ते शिवडी ४ किमी उन्नत मार्ग तर शिवडी ते सीएसएमटी ८.७६५ किमी भुयारी मार्ग असेल. या मार्गावर २ उन्नत आणि ८ भुयारी अशी १० स्थानके असतील.  कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ या मार्गाची एकूण लांबी २०.७५ किमी असून हा संपूर्ण उन्नत मार्ग असेल. 

एमएमआरडीएची नियुक्ती
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परवानग्या देताना हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे. आवश्‍यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro gift to mumbaikar